भाजपतर्फे जागतिक पर्यावरण दिनी ७ हजार देशी झाडांचे रोपण
शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवडमध्ये १४५० बुथप्रमुखांनी पाच झाडे घेतले दत्तक
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडकरांच्या अवतीभवती सदा वृक्षराजी बहरलेली असावीत, यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी ५ जून रोजी शहरात ७ हजार झाडे लावण्यात आले. पक्षाच्या प्रत्येक बुथ प्रमुखाच्या माध्यमातून त्या त्या भागात पाच झाडांची लागवड करून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. शहरात शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, उंबर यांसारख्या देशी झाडांची लागवड करून ते झाडे बुथप्रमुखांनी दत्तक घेतले, अशी माहिती शंकर जगताप यांनी दिली.
जल, जमीन आणि जंगल हे पर्यावरणाचे कान, नाक आणि डोळे आहेत. यापैकी कोणत्याही घटकाला झालेली इजा पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड व मिथेन या वायूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पर्यावरण ही आज जगासमोरील ज्वलंत समस्या बनली आहे. निसर्ग संपत्तीचा ऱ्हास, पर्यावरण ऱ्हास, महापूर, चक्रीवादळे, दुष्काळ, जंगलातील वनवे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील होणारी वाढ, ऋतुचक्रातील बदल, विविध प्रकारची महामारी अशा भयानक संकटांनी अनेक वनस्पती, पशु-पक्षी यांच्या जाती नष्ट होत असून, त्याची भयानकता मानवाच्या अस्तित्वावरही घाला घालत आहे.
सुमारे पाच वर्षापूर्वी कोव्हीड-१९ चा विषाणूने अफाट बुद्धिमान, हुशार आणि शक्तिशाली असलेल्या मानवाला घरात बंदिस्त केले. रात्रंदिवस धावणाऱ्या जगाला कोरोनाने स्तब्ध करून ठेवले. या महामारीने समस्त जगासाठी एक स्पष्ट संदेश दिला आहे. तो मानवाने समजून घेऊन, आपल्या वृत्तीत आणि कृतीत सुधारणा करणे वर्तमानाची गरज व भविष्याची मागणी आहे. या निसर्गाची ‘इकोसिस्टीम’ पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा संकल्प गरजेचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी संपूर्ण शहरात ७ हजारहून अधिक झाडांची लागवड केली, असे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले. शहरात विविध ठिकाणी झालेल्या या उपक्रमामध्ये सोसायटीधारक, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला तसेच शहर भाजपाचे पदाधिकारी यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
देशी झाडांची लागवड….
शहरात भाजपचे १ हजार ४५० बुथप्रमुख आहेत. या प्रत्येक बुथप्रमुखामार्फत त्या त्या भागात प्रत्येकी पाच झाडांची लागवड करण्यात आली. शहरात शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी फक्त देशी झाडांचीच लागवड करण्यात आली. त्यामध्ये वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, उंबर यांसह अन्य देशी झाडांचा समावेश आहे. हवा शुद्ध करून ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढविण्यामध्ये देशी झाडांचा उपयोग होतो. त्यामुळे सर्व बुथप्रमुखांमार्फत देशी झाडे लावण्यात आले. तसेच या झाडांची लागवड करून बुथप्रमुखच ते दत्तक घेऊन संगोपन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.