आयुक्तसाहेब, हे पाप कोठे फेडणार ? – संतोष सौंदणकर चिंचवड स्मशानभूमीच्या रस्त्याचे काम रखडले मेल्यानंतर ही पालिकेकडून मृतांचा छळ सुरुच
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. चिंचवड येथील स्मशान भूमीकडे जाण्यासाठी असणारा ८ मीटरचा रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करुन ठेवला आहे. सहा महिने होऊन गेले तरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात स्थापत्य विभाग उदासीन असल्याचे दिसत आहे. मेल्यानंतर ही महापालिका प्रशासनाकडून मृतांचा छळ सुरु असल्याचा संताप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात मा. संतोष सौंदणकर यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शहराचा विकास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका नागरिकांच्या खिशातून कराचे पैसे घेते. त्या बदल्यात वेगवेगळ्या सुविधा नागरिकांना दिल्या जातात. वेळेत कर भरणा-या नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. चिंचवड येथील स्मशान भूमीकडे जाण्यासाठी असणारा रस्ता खराब झाला. अंत्यविधी करण्यासाठी याच रस्त्याने नागरिकांना स्मशानभूमीकडे जावे लागते. रस्त्याचे काम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सहा महिन्यापूर्वी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. हा रस्ता खोदून ठेवण्यात आला. गेली सहा महिने झाले रस्त्याचे काम स्थापत्य विभागाकडून हाती घेण्यात आले नाही. हा मुख्य रस्ता असल्यामुळे अंत्यविधीसाठी येणा-या नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासक राजवट आहे. आयुक्तांच्या अधिकारात असताना महत्वाच्या रस्त्याची कामे होत नाहीत. जर हा रस्ता तयार करायचा होता तर तो गेली सहा महिने खोदून का ठेवण्यात आला ? याचा खुलासा आयुक्तांनी करावा. जर सहा मीटरचा रस्ता तयार करण्यासाठी सहा महिने लागत असतील तर शहरातील दळणवळणाच्या दृष्टीने अतिमहत्वाचे असणारे 18 मीटर, २0 मीटर, ३0 मीटरचे रस्ते तयार करण्यासाठी किती वर्ष लागतील ?. हा रस्ता तयार करण्यास स्थापत्य विभाग उदासिन असल्याचे दिसते. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. मेल्यानंतरही प्रशासनाकडून मृतांची हेळसांड केली जात आहे. हे पाप कोठे फेडणार ? अशी खंतही सौंदणकर यांनी व्यक्त केली आहे.
पुढील आठ दिवसांत चिंचवड स्मशानभूमीच्या रस्त्याचे काम मार्गी लावावे. यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल. तरी, रस्त्याचे काम पूर्ण करण्यात स्थापत्य विभागातील अधिका-यांनी चालढकल केली तर महापालिकेसमोर तिरडी आंदोलन केले जाईल.
– मा. संतोष सौंदणकर, शिवसेना संघटक, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा)..