शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरात अग्निशमन केंद्राची गरज – अमित गोरखे
– भाजपा पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही महिन्यात तळवडे, शाहूनगर, चिखली आदी ठिकाणी भीषण आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. धक्कादायक म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाली आहे. कहर म्हणजे पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात आगीच्या घटनांमध्येसुध्दा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर या दाट लोकवस्तीच्या परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राची गरज निर्माण झाली आहे. त्या भागात तातडीने अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपा पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी केली आहे.
अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना त्या संदर्भात निवेदन दिले आहे. अमित गोरखे यांनी निवेदनात म्हटले आहे की, शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर या दाट लोकवस्तीच्या परिसरात आगीसारख्या दुर्घटना घडण्याचे प्रकार वाढले आहेत. विविध कारणांमुळे आगीच्या घटना घडत आहेत.
शाहूनगर येथील एका दुकानाला लागलेल्या आगीत दोन अल्पवयीन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. हा दुर्देवी प्रकार 30 ऑगस्ट 2023 रोजी घडला होता. तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल बनविणार्या कंपनीस आग लागून 14 महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. ती दुर्घटना 8 डिसेंबर 2023 रोजी घडली होती. असे प्रकार परिसरात सतत घडत आहेत.
आगीसारखी दुर्घटना घडल्यास तातडीने अग्निशमन विभागाची मदत मिळावी. त्यात जिवीत व वित्त हानीचे प्रकार कमी व्हावे याकरीता शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर या परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राची गरज निर्माण झाली आहे. त्याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे.