ताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक

“बलशाली राष्ट्रासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा!” – शिल्पा बिबीकर

Spread the love
मधुश्री व्याख्यानमाला – द्वितीय पुष्प
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “भारत सक्षम देश व्हावा असे सर्वांनाच वाटते म्हणून बलशाली राष्ट्रासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा!” असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा बिबीकर यांनी स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक १७ मे २०२४ रोजी केले.
मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘शिवाजीराजे जन्माला यावेत पण शेजारच्या घरात’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना शिल्पा बिबीकर बोलत होत्या. माजी महापौर आर. एस. कुमार अध्यक्षस्थानी होते; तसेच मधुश्रीच्या अध्यक्ष माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार, सचिव राजेंद्र बाबर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानापूर्वी, बालसाहित्यिका रजनी अहेरराव, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील, सुयश कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. आर. एस. कुमार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “व्याख्यानमालेच्या माध्यमातून विविध विषयांवर जनजागृतीपर कार्य केले जाते!” असे मत व्यक्त केले.
शिल्पा बिबीकर पुढे म्हणाल्या की, “प्रजेवर छत्रछाया धरणारा तो छत्रपती असे मानले जाते. शिवाजीमहाराज यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कर्तव्यदक्ष, धैर्यशील, शूर अशा अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. आपल्या आयुष्याचे समर्पण देऊन महाराजांनी एक आदर्श राज्य निर्माण केले होते. आताच्या काळात एखाद्या देशाच्या बलस्थानांवर नियोजितपणे कटकारस्थान करून त्याचे खच्चीकरण केले जाते. आपल्या देशाची समृद्ध संस्कृती आणि परंपरा, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था या गोष्टी नामशेष व्हाव्यात म्हणून शत्रुराष्ट्रांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. एकेकाळी संपूर्ण देशात समृद्ध असलेला पंजाब प्रांत देशाच्या हितशत्रूंकडून व्यसनांच्या विळख्यात जखडून टाकण्यात आला. भारत संरक्षण क्षेत्रात, अवकाश संशोधनात स्वयंपूर्ण होऊ नये म्हणून बड्या राष्ट्रांनी निर्बंधांसह अनेक अडथळे निर्माण केलेत; पण राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या वैज्ञानिकांनी अथक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण योगदानातून भारताला आत्मनिर्भर बनवले. इस्त्रोसारख्या संस्थांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे; तर वैयक्तिक पातळीवर आदिवासी, ग्रामीण आणि अभावग्रस्त तरुणाईचे वेगवेगळ्या क्षेत्रातील यासाठीचे समर्पण कौतुकास्पद आहे. कोणत्याही प्रकारची प्रसिद्ध, नावलौकिक यापासून दूर राहून ते देशासाठी काम करीत आहेत. त्यामुळेच शिवाजीराजे आपल्याही घरात जन्माला यायला हवेत, अशी नवी मानसिकता आता बाळगायला हवी!” विविध प्रकारची उदाहरणे देऊन बिबीकर यांनी विषयाची मांडणी केली.
रमेश वाकनीस, राज अहेरराव, नेहा कुलकर्णी, अजित देशपांडे, रेणुका हजारे, सुनील देशपांडे, अश्विनी कुलकर्णी, चंद्रकांत शेडगे, मनीषा मुळे, चिंतामणी कुलकर्णी, विनायक गुहे यांनी संयोजनात सहकार्य केले. पी. बी. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला केळकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button