ताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक

अंतर्मनाचा ठाव घेत काळजातून आलेली कविता देते जगण्याची प्रेरणा – भारत सासणे यांचे प्रतिपादन

Spread the love

 

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसतर्फे ‘त्रिकाल’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “मानवाच्या अंतरमनात डोकावण्याची ताकत कवीच्या लेखनात असते. अंतर्मनाचा ठाव घेत काळजातून आलेली कविता आपल्याला जगण्याची प्रेरणा देते. फ. मु. शिंदे यांच्या कवितांमध्ये विश्व कारुण्य दिसते. वाट पाहण्याची, सहनशीलतेची क्षमता असणाऱ्या फ. मु. यांच्या ‘त्रिकाल’ काव्यसंग्रहात माणसाच्या जीवनाचे अप्रतिम दर्शन घडते. रसिकांना घडवण्याचे, समृद्ध करण्याचे काम यातून होत आहे. त्रिकाल सत्य सांगणाऱ्या या कविता आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कथा-कादंबरीकार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत ससाणे यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस आयोजित प्रसिद्ध कवी, लेखक फ. मु. शिंदे यांच्या ‘त्रिकाल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कवी फ. मु. शिंदे, लीलाताई शिंदे, विडंबनकार, पटकथा लेखक-दिग्दर्शक रामदास फुटाणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक-समीक्षक डॉ. रमेश वरखेडे, लेखक-समीक्षक प्रा. डॉ. राजशेखर शिंदे उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजिला होता. सभागृहात साहित्यिक राजन लाखे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, वि. दा. पिंगळे, कवयित्री डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, संवाद पुणेचे सुनील महाजन, माधव राजगुरू, सतीश पिंपळगावकर यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “फ. मु. शिंदे यांनी मराठी साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या ‘आई’ या कवितेने महाराष्ट्रातील प्रत्येक रसिकाला भारावून टाकले आहे. साहित्य संमेलन, साहित्यिकांच्या सहवासातून साहित्य क्षेत्रात योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. चांगल्या साहित्यकृतीला प्रोत्साहन देऊन त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे. गंभीर विचारांची प्रतिभा असलेला, सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी यांना जोडणारा, समाजभान असलेला हा कवी आहे. त्यांच्या विचार व भावविश्वाची ओळख रसिकांना होते. सामाजिक भाष्य करणाऱ्या, विद्रोहाची मांडणी असलेल्या या कविता आहे. वैचारिक व चिंतनशील स्वरूपाच्या या रचना समाजाला प्रबोधनपर असून, रसिकांना अंतर्मुख करायला लावतात. रसिकांशी संवाद करणारी त्यांची कविता आहे.”

फ. मु. यांनी आपल्या मिश्किल शैलीत कार्यक्रमाचे निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, “साहित्यिकाला दाद कशी द्यावी, याचे मूर्तिमंत उदाहरण पी. डी. पाटील सर आहेत. असा सोहळा होणे ही कवीच्या आयुष्यात लक्षणीय गोष्ट असते. कवीने समाजाचे भावविश्व शब्दांत गुंफावे. आजवरच्या जगण्यात अनुभवलेले भवताल, समाजातील विविध घटना, प्रसंग टिपण्याचा प्रयत्न ‘त्रिकाल’ काव्यसंग्रहातून केला आहे. तुमचे सांगायचे राहून गेलेले असते, ते कवी मांडतो. रसिक आणि कवी यांच्यातील अनुबंधाचा भाग कविता असते.” यावेळी त्यांनी सादर केलेल्या ‘आई’, ‘मनासारखे जगण्यास आता मन होत नाही’, ‘खोटे चालते पुढे, पाय मोडला खऱ्याचा’ व ‘पी. डी. पाटील’ या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

रामदास फुटाणे म्हणाले, “औद्योगिक नगरीला साहित्यनगरी करण्याचे काम पी. डी. सरांकडून होत आहे. फ. मु. यांच्या ओठांत खट्याळपणा, तर हृदयात संवेदनशीलपणा आहे. राजकारण इतके विचित्र आहे की साहित्यिकांनी बोलावे की नाही, अशी स्थिती आहे. वात्रटिकांचे उद्गाते पाडगावकर आणि फ. मु. आहेत. कवी, साहित्यिकांनी निडरपणे आपल्या भूमिका मांडायला हव्यात.”

प्रा. डॉ . राजशेखर शिंदे म्हणाले, “एकूण २५४ तुकड्यांत मांडलेले ‘त्रिकाल’ हे कवीचे, समाजाचे चरित्र आहे. दंश, डंख, विखारी अनुभव कविमनाला प्रश्न करतात. उत्तरांचा शोध घेत अभिजात प्रवृत्तीचे दर्शन घडविण्याचे काम कवी ‘त्रिकाल’मध्ये करत आहे. मिश्किल स्वभावाचे असलेले फ. मु. कवी म्हणून तितकेच संवेदनशील, सामाजिक भान, कारुण्यभाव असलेले व्यक्तिमत्व आहे.”

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “छंदाचे, लयीचे अनेक प्रयोग करणारे कवी आज कमी झाले आहेत. डोळ्यांत अंजन घालणाऱ्या काव्याची निर्मिती व्हायला हवी. फ. मु. आणि रामदास फुटाणे यांनी मराठी कविता सर्वदूर पोहोचवण्यात मोठे योगदान दिले आहे. राजकारण्यांचा, समाजाचा तोल ढळतो, तेव्हा सावरण्याचे काम कवी करत असतो. वैभवशाली मराठी साहित्याचे दर्शन घडवण्याचे काम पी. डी. पाटील सातत्याने करीत आहेत.”

डॉ रमेश वरखेडे म्हणाले, “त्रिकालची गुणात्मक व्याप्ती ही तुकोबांच्या गाथा इतकी विशाल आहे. भावविश्वाचा सर्वांगाने घेतलेला आढावा या काव्यसंग्रहात दिसतो. अनुभव छटांची रांगोळी जणू यामध्ये दिसते.” ज्यांनी आई ही कविता रचली, त्यांच्या वाणीतून टी रचना ऐकणे हा मणिकांचन योग असल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली.

प्रकाशिका अमृता तांदळे यांनी प्रास्ताविक केले. गायिका प्रांजली बर्वे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात, तर पसायदानाने सांगता झाली. प्रा. प्रतिमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button