ताज्या घडामोडीपिंपरी
भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मतदान केंद्रात कशा पध्दतीने मतदान प्रक्रिया पार पडते? याबद्दल अनेक जण अनभिज्ञ हाेते. मात्र, पहिल्यांदा मतदानाला आल्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून आले. राजकारणाबाबत तरूणाई सजग झाली आहे. काेण काेणते उमेदवार लाेकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत ? त्यांची वैयक्तीक, काैटुंबिक, राजकीय पार्श्वभूमी आहे ? सध्याचे राजकीय समीकरणे काय आहेत ? या सर्व बाबींचा अभ्यास करून ते सजगतेने आत्मविश्वासाने मतदान करताना दिसून आले.



महापालिका निवडणूका दाेन वर्षापासून रखडल्यामुळे अठरा वर्षे पूर्ण हाेऊनही अनेक तरूणांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लाेकसभा निवडणूकीपर्यंत वाट पहावी लागली. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरूणाईची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले. भर उन्हात सळसळत्या उत्साहात तरूणाईने मतदानाचा हक्क बजावला.
शहराचा विकास करण्याची क्षमता असलेला नेता निवडून आला पाहिजे. पहिल्यांदा मतदान करणार असल्याने उत्सुकता हाेती. खूप आनंद वाटला यापुढील निवडणुकांमध्येही मतदान करणार आहे – गौरव उमेश पाटील .
मतदान केंद्राच्या आतमध्ये कशाप्रकारे कार्य चालते हे पहिल्यांदा अनुभवले. काेणते उमेदवार उभा आहेत याची माहिती घेतली तसेच कुटुंबियांशी चर्चा केली हाेती. काेण आमच्या भागातील प्रश्न साेडवू शकताे? विकास कामे करेल याचा विचार करून घरातून निघतानाच काेणत्या उमेदवाराला मत द्यायचे ठरवून आले हाेते – स्वराज गायकवाड
मी पहिल्यांदा मतदान केले. मतदान केंद्रात येण्यापूर्वी सर्व उमेदवारांबद्दल माहिती घेतली हाेती आणि अगदी सहजपणे मतदानही केलं. खूप चांगले वाटत आहे. – ऋतुजा संजय मोहिते
समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा चांगला उमेदवार निवडून आला पाहिजे. देशात लाेकशाही टिकण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरूण वर्गाने पुढे आले पाहिजे – आशिष गावडे








