Shirur Lok Sabha Election: धर्मवीर संभाजी महाराज बलिदानस्थळाचा विकास होतोय; म्हणून देऊया महायुतीला साथ!
– भाजपा आमदार महेश लांडगे यांचे शिरुर मतदार संघात आवाहन
– धर्माभिमानी, शिव-भंभूप्रेमी नागरिकांनी महायुतीला मतदान करा
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ वढू (बु.) विकासासाठी महायुती सरकारने ३९७ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा आणि संवर्धन करण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र व राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर उभारणी, जम्मू-कश्मिरमधील ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक, सर्जिकल स्ट्राईक, जी-२० परिषद, कोविड संकटात देशाच्या आरोग्य व्यवस्थेची कामगिरी अशा विविध मुद्यांवर सर्वसामान्य नागरिकांना मोदी सरकारच्या १० वर्षांतील कामगिरीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत महायुतीची भूमिका, प्रचार चिन्ह पोहोचवण्यासाठी आमदार लांडगे यांनी जनसंवाद सभांचा धडाका लावला आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण कार्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रति सर्वसामान्य नागरिकांच्या मनात धर्माभिमानी नेतृत्त्व अशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळ व बलिदान स्थळाच्या विकासासाठी ३९७ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.
तुळापूर येथील विकासकामांवर १५८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे क्षेत्रफळ ८ एकर असून त्यात रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, गॅलरी, कार्यालय, संग्रहालय, वाहनतळ, स्वच्छतागृह, प्रवेशद्वार आदी सुविधा पुरवल्या जाणार आहे. वढू बुद्रुक विकासासाठी ११० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. मंदिर, पार्किंग, संग्रहालय, स्मारकाचे प्रवेशद्वार आदी सुविधा असणार असून दर शनिवार आणि रविवारी इथे ४ ते ५ हजार नागरिक भेट देतात. वढू बुद्रुक येथे शिल्प, कवी कलश समाधी, मेघडंबरी असेल, असेही आमदार लांडगे यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या काळात भारतीय ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात आली. वढू-तुळापूर येथील बलिदान दिनी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून ५ लाखांचा निधी देण्याची भूमिका आम्ही घेतली. त्यानंतर राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून ‘‘धर्मवीर संभाजी महाराज बलिदान स्थळ’ विकास आराखड्याकरिता ३९७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे शिव-शंभूप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण असून, या निवडणुकीत शिव-शंभू विचारांचा महाराष्ट्र महायुतीच्या पाठिशी राहील, असा विश्वास वाटतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, निवडणूक प्रमुख, शिरुर लोकसभा, भाजपा.