शिरुरच्या बारा गावांचा दुष्काळ संपविणार हा माझा शब्द – अजित पवार


केंदूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बारा गावांच्या दुष्काळ संपवायचा आहे आणि तो हा अजित पवार संपवेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाबाबत मार्ग काढलेला आहे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव यांनीही प्रयत्न केल्याने या प्रश्नाबाबत सर्व्हेक्षणाचे आदेशही झालेले आहेत. त्यामुळे मी आत्ताच शब्द देतो बारा गावांचा दुष्काळ मी संपविणार फक्त मतदानात बिल्कूल हयगय न करता शिवाजीराव आढळरावांना विजयी करा असे म्हणत अजित पवार यांनी केंदूर (ता.शिरूर) येथील प्रचार सभा गाजविली.



केंदूर येथील श्रीराम चौकात सभा सुरू होताच अजित पवार यांनी थेट आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांना बोलायला दिले. सौ.साकोरे यांनी या भागाती दुष्काळ, येथील पाणी प्रश्न आणि त्यासाठी वळसे-आढळरावांसह देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बैठकांची माहिती दिली. दरम्यान सौ.साकोरे यांच्यानंतर अजित पवार यांनी लगचे बोलायला उभे राहून पूर्वीचा बारामती आणि आत्ताचा शिरुर मतदार संघ असा मतदार संघ आढावा घेत आपण सन १९९२ मध्ये येथे खासदार राहिल्याने येथील सर्व प्रश्न ज्ञात असल्याचे सांगितले. मुळचे केंदूर येथील असलेले माजी दिवंगत खासदार बापूसाहेब थिटे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या खासदारकीच्या निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी आपण घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल अजित पवार यांनी खुलुन बोलताना सांगितले की, सन २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी असताना ती पवार साहेबांनी नाकारली. सोनिया गांधीचा परदेशीचा मुद्दा पुढे करीत पवार साहेबांनी कॉंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे सन २०१९ मध्ये भाजपा सोबत जायचे ठरले आणि त्यांनी माघार घेतली. या धरसोडीमध्ये मी शेवटी भाजपासोबत जावून सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि ७२ तास उपमुख्यमंत्रीही झालो. मात्र राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक असल्याचे मी त्यांना सांगितले तरीही साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता.

एक सांगतो, मी त्यांचा मुलगा असतो तर असे निर्णय त्यांनी घेतले असते का याचे उत्तर मलाही समजत नाही. या सर्व घडामोडींना वैतागुनच अखेर मी निर्णय घेतला व आज तुमच्यापुढे उभा आहे. वयाच्या साठीनंतर तरी आम्हाला आमचे निर्णयाचे स्वातंत्र यामुळे मिळाले एवढेच सांगतो. अखेर एक सांगतो, इथले वातावरणही भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. तसे काही होवू देवू नका. आम्ही बारामतीत मोठ्या फरकाने विजयी होतोय इथेही तसाच निर्णय घ्या म्हणत अजित पवारांनी मतदारांना आवाहन केले.
कार्यक्रमाला आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे, पुणे जिल्हा दुध संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार, जिल्हा बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, भिमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, उपसभापती सविता प-हाड, प्रमोद प-हाड, सविता बगाटे, माजी सरपंच सुवर्णा थिटे, सतीश थिटे, भगवानराव शेळके, चंदन सोंडेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राम साकोरे यांनी केले तर आभार सरपंच अमोल थिटे यांनी मानले.








