पिंपरी मतदारसंघाचे व्होटर स्लीपचे वाटप प्रगतीपथावर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे मतदान १३ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३,७३,४४८ मतदारांपर्यंत येत्या आठवड्याभरात व्होटर स्लीप ( मतदार चिठ्ठी ) पोहचविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी अंतिम झाल्यामुळे व्होटर स्लीप ( मतदार चिठ्ठी ) वाटप सुरु करण्यात आलेले आहे.
पिंपरी मतदारसंघांतर्गत ४०० मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार व्होटर स्लीपचे वाटप करण्यासाठी ४०० बूथ स्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नेमणूक करण्यात आलेली असून बीएलओ घरोघरी जाऊन व्होटर स्लीपचे वाटप करीत आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधुन व्होटर स्लीपचे वाटप करण्यात येत आहे. शिवाय मनपाच्या ८ क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार मदत केंद्र चालू करण्यात आलेले आहेत. सहकारी उपनिबंधक कार्यालय पुणे ३ यांचे सहकार्याने मतदार संघातील सहकारी गृहरचना सोसायट्यांमध्ये व्होटर स्लीप वाटपाचे कामकाज करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुदतीमध्ये व्होटर स्लीप वाटपाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.
मतदानाची टक्केवारी वाढविणेकरिता पिंपरी चिंचवड शहरातील कलावंत, खेळाडु, उद्योजक, शासकीय अधिकारी यांनी मतदान करण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करणेत येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन सिनेनाट्य अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मुष्टियोद्धा राजदूत गोपाल देवांग , पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांचे घरी समक्ष व्होटर स्लीपचे वाटप करण्यात आलेले आहे.