नागलोक असोसिएशनच्यावतीने महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील नागलोक असोसिएशनच्या वतीने महापुरुषांची संयुक्त जयंती व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व्याख्याते डॉ. प्रकाश हसनाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम गाणार, उपाध्यक्ष किसनराव थूल, उपाध्यक्ष वसंतराव बोले, विजय चौधरी व प्रा. रवींद्र इंगोले, भंते सुमंगल, भंते विपश्यीबोधी, भंते बोधीराजा आदी उपस्थित होते.
सुत्तपठन केल्यानंतर भंते सुमंगल यांनी धम्मदेशना देताना सांगितले की, धम्माच्या आचारणानेच मनुष्यास सुख, शांती व आनंद मिळतो. मनुष्य शिलेचा विकास, विवेक, प्रज्ञा जागृत करू शकतो.
डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी ‘फुले- शाहू- आंबेडकर यांच्या जीवन प्रेरणेतून समाजाच्या वर्तमान सामाजिक परिवर्तनाची दिशा’ या विषयावर बोलताना सांगितले, की प्रत्येकाने संविधानाचे रक्षण केले पाहिजे, ही नागरिकांची वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येक जण न्यायालयासमोर समान आहे व विषमता काय आहे, हे सर्वांना सांगितले पाहिजे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारित नवराष्ट्राची निर्मिती करावयाची होती. समाजाचा विकास व जडण घडणीसाठी फुले, शाहू, आंबेडकरांचे योगदान अनमोल होते.
दरम्यान, प्रकाश वाघमारे (सह आयुक्त, समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई), गुलाबराव आढाव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अंकुर गजभिये (सह संचालक सी- डॅक), प्राचार्या माधुरी भारशंकर – नगराळे, असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप लोखंडे, आर. आर. पाटील, माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे, सह आयुक्त (पशुसंवर्धन) विश्वनाथ भुक्तर, पौर्णिमा काटकर, उद्योजक राजकुमार बाविस्कर, निवृत्त सहसचिव सुखदेव पाटील आदी सदस्य व पदोन्नती मिळालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष पुरुषोत्तम गाणार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवायचे आहेत. त्यामध्ये शैक्षणिक संस्था निर्माण करणे, ध्यानाचे, प्रबोधनाच्या शिबिरांचे आयोजन करणे याचा समावेश आहे. दरम्यान, मंजुल भारद्वाज लिखित ‘लोकशास्त्र सावित्री’ हे नाटक रंगमंचावर सादर करण्यात आले.
प्रास्ताविक विजय चौधरी यांनी, सूत्रसंचालन रवींद्र इंगोले यांनी, तर आभार किसनराव थूल यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुवासाहेब अहिवळे, रमेश बोधी, कैलास गजभिये, आर.खडसे, बी.बी. अलोने, मेश्राम, जयकुमार इंगोले यांनी परिश्रम घेतले.