लेख – आरोग्य क्षेत्रात सेवाभावीपणे काम करणारे पंच्याहत्तरीतील तरुण चैतन्यमूर्ती – डॉ. लक्ष्मण कार्ले
आरोग्य क्षेत्रात सेवाभावीपणे काम करणारे पंच्याहत्तरीतील तरुण चैतन्यमूर्ती – डॉ. लक्ष्मण कार्ले
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजात असे फार थोडे लोक आहेत, जे आपल्या प्रोफेशनसोबतच समाजहितालाही प्राधान्य देत आलेले दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे तळेगाव दाभाडे येथील डॉ. लक्ष्मण कार्ले. डॉ. लक्ष्मण कार्ले वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करीत आहेत. समाजातील गरीब, गरोदर महिलांच्या आरोग्यात सुधारणा झाली पाहिजे, या ध्येयाने पंच्याहत्तरीतला हा तरुण सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा धांदोळा…
डॉ. लक्ष्मण कार्ले यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील पांढरी हे होय. ४ मे १९५० हा त्यांचा जन्मदिवस. सहा भावंडांमध्ये हे थोरले आहेत. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून एमबीबीएस, डीसीपी आणि नाक कान व घसा तज्ञ पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. ते पुण्यातील ससून रुग्णालयात सलग पंधरा वर्ष वैद्यकीय अधिकारी वर्ग एक म्हणून कार्यरत होते. ३१ मे २००८ रोजी ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक काम करण्याच्या प्रबळ इच्छेने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. त्यामुळे त्यांनी निवृत्तीनंतर प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी व मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे येथे सेवा केली. ते आरोग्य सेवेतील कोणता तरी उपक्रम घेऊनच दरवर्षी आपला वाढदिवस साजरा करतात. हाती घेतलेले काम झोकून देऊन पूर्ण करण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. ते रुग्णांविषयी आत्मीयता जपण्याचे काम करीत आले आहेत. कोणत्याही रुग्णांनी कधी मदत मागितल्यास त्याला शक्य तेवढी मदत करणे, मार्गदर्शन करणे यावर त्यांचा भर असतो.
गेल्या २० वर्षांपासून रुग्णसेवा आणि आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आले आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ब्लड बँकांना तब्बल पाच लाख युनिट रक्तपुरवठा केला आहे. त्यांच्या या अतुलनीय कामाबाबत राज्य सरकारने त्यांचा गौरव केला आहे. संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या महाप्रलयकारी 1993 च्या किल्लारी भूकंपानंतर उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत त्यांनी तात्काळ धाव घेत भूकंपातील जखमींवर उपचार केले. त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले.
याबरोबरच कोरोना काळात सामाजिक, आध्यात्मिक आणि धार्मिक या क्षेत्रांमध्येही त्यांनी विविध प्रकारे मदत करीत उल्लेखनीय काम केले आहे. गरीब, गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार व सेवा देण्याचे कार्य ते करीत आहेत. कोरोना काळात भीतीच्या सावटाखाली असलेल्या गरीब, गरजू रुग्णांच्या घरी जाऊन अल्प दरात औषधोपचार देण्याचे कामही त्यांनी केले आहे. अनेक जीर्ण आजार झालेल्या रुग्णांना बरं करण्याचा त्यांचा हातकंडा आहे. वयाच्या पंचाहत्तरीत त्यांनी केवळ गरीब, गरजू गरोदर महिलांना रुग्णसेवा देण्याच्या उद्देशाने खालुंब्रे येथे श्रद्धा हेल्थकेअर दवाखाना सुरू केला असून, त्या माध्यमातून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य करीत आहेत. निःशुल्क सेवा मिळत असल्याने गोरगरीब आणि गरजू गर्भवती मातांसाठी हे रुग्णालय संजीवनी ठरत आहे. रुग्णावर उपचार करण्याबरोबरच, त्यांना इथे भावनिक आधार मिळतो, चिंतामुक्त होण्यास मदत होते आणि बरे करण्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. डॉक्टर म्हणून त्यांना रुग्णाच्या सर्वांगीण विकासाकडे पहावे लागते. रुग्णांच्या निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याला ते प्राधान्य देत आले आहेत. या रुग्णालयात कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने या रुग्णालयाला कार्यान्वित करण्यात आले आहे.
गेल्या 40 वर्षाचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव असलेले निष्णात तज्ज्ञ डॉ. लक्ष्मण कार्ले हे सेवा देत आहेत. यामध्ये छोटे ऑपरेशन, ड्रेसिंग, रक्त तपासणी, युवकांचे आरोग्य, जुन्या आजारांवर उपचार, गरोदर मातांची तपासणी व उपचार, आहाराविषयी सल्ला, स्त्रीरोग तपासणी, गुप्तरोग तपासणी, बालरोग तपासणी, न्याय वैद्यकीय प्रमाणपत्र व सल्ला देणे, कान-नाक-घसा आजारांवर सल्ला, वयोवृद्धांचे आजार व तपासणी, योग साधना व त्याविषयी मार्गदर्शन करीत आले आहेत. सामाजिक बांधिलकीतून मागील 20 वर्षांपासून मोफत सर्वरोग निदान, औषधोपचार व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करत असतात.
आरोग्यसेवा, रुग्णसेवा आणि समाजहितासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन समाजाच्या विविध स्तरातून त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नॅशनल ब्लाईंडनेस कंट्रोल अवॉर्ड, लाईफ प्राईड अवॉर्ड, आरोग्यरत्न सेवा गौरव, कोरोना योद्धा, आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ, महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतीक महोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘विश्वशांतीदूत बाबा आमटे शांतीभूषण’ पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड यांच्यातर्फे डॉ. कार्ले यांना आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. शिवाय स्थानिक पातळीवरील अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन गौरविण्यात आले आहे.
एकंदरीत, वयाच्या पंच्याहत्तरीतही तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्यात दिसतो. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावानेतून डॉ. कार्ले काम करीत आहेत. अमुलाग्र बदल झालेल्या आधुनिक जगतात डॉ. कार्ले नि:स्वार्थीपणे करीत असलेले सेवाकार्य समाजाला दखल घेण्यास भाग पाडणारे असेच आहे.