मराठा आरक्षणाबाबत संसदेत भक्कमपणे बाजू मांडू : संजोग वाघेरे पाटील
– सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेवू
– खोपोलीतील बैठकीत सकल मराठा बांधवांचा संजोग वाघेरेंना पाठिंबा
खोपोली (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम करण्याची भुमिका राजकारण व समाजकारण करताना नेहमीच घेतली आहे. मात्र, मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून समाजासाठी भुमिका घेण्यासाठी मी बांधील आहे. मराठा आरक्षणाबाबत संसदेत भक्कमपणे बाजू मांडण्याचे काम करु. मराठा समाजासोबत सर्वच समाज घटकांना न्याय देवू, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी दिला.
खोपोली येथील श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडलेल्या बैठकीत कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरणसह रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांनी संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सकल मराठा समाजाचे प्रमुख महाराष्ट्र समन्वयक डॉ. सुनील पाटील, विनोद साबळे, शंकरराव थोरवे, गणेश कडू, जिल्हाध्यक्ष मराठा समाज उत्तम भोईर, प्रकाश पालकर, मारुती पाटील, राजेश लाड, भानुदास पालकर, सुरेश बोराडे, नितीन मोरे, अविनाश तावरे, दीपक लाड, किरण हडप, एकनाथ पिंगळे, धनश्री दिवाणे, मंगेश दळवी, रमेश जाधव, मनीष जाधव, अविनाश तावरे, उदय पाटील, उमेश मसे, अशोक सावंत, मनोहर देशमुख यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले की, समाजाच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. माझ्यावर प्रेम करणा-या समाजासाठी मला भांडायचं आहे. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होणार नाही. तोपर्यंत खासदार झाल्यानंतर सत्कार आणि हार तुरे स्वीकारणार नाही. तुम्ही टाकलेली जबाबदारी मी स्वीकारली आहे. मी इतरांप्रमाणे रंग बदलणार नाही. मला कामासाठी केव्हाही आदेश द्या. त्या त्या वेळेस मी हजर असेन. मी वाघेरे पाटील शब्दाला पक्का आहे. आपला विश्वास सार्थ करण्यासाठी सदैव आपल्यासोबत असेल. तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. एवढी गॅरंटी देऊ शकतो, असं वाघेरे पाटील आवर्जून म्हणाले. मी माळकरी असून वारकरी संप्रदायात काम करीत आहे. तरुणांसाठी, लोकांसाठी काम करीत आहे. कोणत्याही आर्थिक, सामाजिक संकटात अडकलेल्या कुटुंबाना आणि समाज बांधवांसाठी काम करण्याची तयारी असल्याचे देखील ते म्हणाले.
या बैठकीत आरक्षणाचा मुद्दा आणि समाजाची कशा पद्धतीने फसवणूक सरकारने केली, हे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “एक मराठा लाख मराठा”, “लाख मराठा कोटी मराठा” अशा घोषणा देण्यात आल्या.
*खासदारांनी मराठा आरक्षणाचा ‘म’ देखील काढला नाही: विनोद साबळे*
या बैठकीत समाजाचे समन्वयक विनोद साबळे म्हणाले की, सकल मराठा समाजाच्या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील मराठा समाज सातत्याने सहभागी झाला. मतदारसंघात पन्नास ते साठ टक्के मतदान मराठा समाजाचे आहे. या लोकसभेत समाजाची बाजु न घेणा-यांना घरी बसवले पाहिजे. आताच्या खासदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत “म” देखील काढलेला नाही. त्या माणसाला समाजाबद्दल काहीच वाटत नाही. मराठा आरक्षणावर आमचे कित्येक वेळा उपोषण झाले मात्र, ते एकदाही फिरकले नाहीत. त्यांना ही ताकद समजली नाही. संजोग वाघेरे पाटील आरक्षणाच्या लढ्याला बळ देणारी भुमिका घेतील, त्यामुळे आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.