कोरोना काळात फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना कायमचे घरी बसवा – संदीप देशपांडे
उद्धव ठाकरे हे आधुनिक महाभारतातील दुर्योधन – संदीप देशपांडे
हुकूमशाही तर उद्धव ठाकरे यांनी केली – संदीप देशपांडे
कर्जत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोरोनाच्या संकटकाळात घरातून बाहेर न पडता ‘फेसबुक लाईव्ह’ करण्यातच धन्यता मानणाऱ्यांना कायमचे घरी बसवा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले. सत्तेसाठी शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसणारे उद्धव ठाकरे हे आधुनिक महाभारतातील दुर्योधनच आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता महामेळाव्यात ते बोलत होते.
त्यावेळी मनसेचे नेते अमेय खोपकर, दिलीप बापू धोत्रे, आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष सचिन करणुक, कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, खालापूर तालुकाध्यक्ष विजय सावंत, पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, जे पी पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सपना राऊत यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सहानुभूतीची अपेक्षा कशी ठेवता?’
संदीप देशपांडे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आमदार सांभाळता आले नाहीत. त्यामुळे त्यांना सहानुभूती दाखविण्याचे काहीही कारण नाही. मनसेचे नगरसेवक फोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आमदारांनी साथ सोडली तेव्हा वाईट वाटायचे काहीच कारण नाही.
सत्तेच्या लालसेपोटी पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेले आधुनिक महाभारतातील ते दुर्योधन आहेत. संजोग वाघेरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादीची पोर सांभाळायला उद्धव ठाकरे यांनी पक्ष काढला आहे का, असा सवाल त्यांनी केला.
*’हुकूमशाही तर तुमची होती’*
मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन केले म्हणून आमच्यावर खोट्या केसेस टाकल्या, माझ्यावर मारेकरी घातले, तेव्हा कुठे होती लोकशाही, असा प्रश्न करीत देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप केला. राजकारणी म्हणून उद्धव ठाकरे नीच आहेतच, पण भाऊ म्हणून देखील ते नीच आहेत, या शब्दांत देशपांडे यांनी टीका केली.
श्रीरंग बारणे हे अभ्यासू खासदार आहेत. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा संसदेत पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन देशपांडे यांनी केले.
*’राज ठाकरे यांचा योग्य वेळी योग्य निर्णय’*
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्पात पाठिंबा दिल्याबद्दल खासदार बारणे यांनी त्यांना धन्यवाद दिले. देशहिताचा विचार करून राज साहेबांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, असे ते म्हणाले. खासदार बारणे यांना कर्जत-सोलापूर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही आमदार थोरवे यांनी दिली.
कर्जत-खालापूर मतदार संघातून खासदार बारणे यांना एक लाखाचे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार मनसेच्या महामेळाव्यात करण्यात आला.