बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची – सुनील शेळके
कर्जतमध्ये बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यात निर्धार
कर्जत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहील, अशी ग्वाही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज (शुक्रवारी) दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
व्यासपीठावर खासदार बारणे, आमदार शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, दत्तात्रय म्हसुरकर, अशोक भोपतराव, भगवान भोईर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उमा मुंडे, कर्जतचे तालुकाध्यक्ष भगवान चंचे, खालापूरचे तालुकाध्यक्ष संतोष बेलमारे तसेच एच आर पाटील, भरत भगत, शिवाजी खारीक, अंकित साखरे, रजनीताई धुळे, प्राची पाटील, संभाजी जगताप, स्वप्निल भालकर, अक्षय पिंगळे, भाई कोतवाल, हिराजी पाटील आधी पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार शेळके म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत मी स्वतः पार्थ पवार यांच्या विरोधात काम केले होते, तरी देखील अजितदादांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. आमदार केले आणि मावळ तालुक्याच्या विकासासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा निधी देखील दिला. अशा नेत्याच्या शब्दासाठी आपण काहीही करू शकतो. अजित पवार यांनी मावळात धनुष्यबाण चालवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आहे.
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सुधाकर घारे यांच्या रूपाने एक कर्तृत्ववान तरुण न नेता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे. या नेत्याला भविष्यात न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे, असे आवाहनही शेळके यांनी केले.
खासदार बारणे यांनी तालुक्यात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा सादर केला. कर्जत तालुक्यातील तुंगी सारख्या आदिवासी खेड्यात स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी वीज आणि रस्ता पोहोचवता आला, याचा विशेष आनंद आहे, असं ते म्हणाले. अटल सेतू, मेट्रो यासारख्या मोठ्या कामांबरोबरच शासकीय योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. अजूनही याबाबत अनेक विकास कामे प्रस्तावित आहेत, असे त्यांनी सांगितले. मावळचे मतदार विकासाच्या बाजूनेच मतदान करतील, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीनंतरही महायुती कायम राहणार आहे. महायुतीच्या वतीने भविष्यात कोणाला संधी दिली जाईल, याचा निर्णय केंद्र व राज्याचे नेतृत्व घेईल. पण निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाची जाणीव आपण सदैव ठेवू, अशी ग्वाही बारणे यांनी दिली.
एकनाथ धुळे यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर घारे, दत्तात्रय म्हसुरकर, उमाताई मुंडे, अशोक भोपतराव, हनुमंत पिंगळे, रंजना धुळे आदींची यावेळी भाषणे झाली.