रोजी रोटीचा सवाल कालही होता आजही आहे पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या वतीने श्रमप्रतिष्ठा जागर फेरी
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या वतीने एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे स्मृती जागर करीत बजाज ऑटोचे शहीद कामगार दत्तात्रय पाडळे यांच्या आकुर्डी येथील पुतळ्यापासून ते कॉम्रेड रुपमय चटर्जी यांच्या पुतळ्यापर्यंत कामगारांची श्रमप्रतिष्ठा जागर फेरी काढण्यात आली.
पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे पंकज पाटील, संगीता जोगदंड, विकास कोरे, आण्णा गुरव , अरुण परदेशी, शामराव सरकाळे, भाऊसाहेब गायकवाड, सुरेश कंक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शहीद दत्ता पाडळे यांच्या पुतळ्याला भाव पुष्पांजली अर्पण करून कामगार श्रमप्रतिष्ठा फेरीची सुरुवात झाली.
याप्रसंगी आप्पा बागल, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, वसंत कामथे, दिनकर मोरे, लक्ष्मण शिंदे, शिवाजी पाटील, बळीराम शेवते, दिनकर पाटील, अमोल लोंढे, मालोजी भालके, अनिल हराळे, अमित निंबाळकर, आनंद निकम, बाळासाहेब साळुंके, दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.
कॉम्रेड रुपमय चटर्जी यांच्या पुतळ्याजवळ
सांगता कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक आणि कामगार नेते अरुण बोऱ्हाडे म्हणाले.
” देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अजूनही आपण श्रमाला योग्य मोबदला देऊ शकत नाही. प्राथमिक मानवी गरजा रोटी, कपडा और मकान आहेत याच गरजांची पूर्तता व्हावी म्हणून श्रमिक कामगार घाम गाळतो. त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला देण्याचे काम शासन आणि कामगार संघटनांचे आहे.
सातत्याने देशाची लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे प्रश्न जटील होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधणे, आणि यासाठी प्रयत्नवादी असणे हाच खरा कामगार दिन असणार आहे.”
पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे म्हणाले.
” गेल्या पंचवीस वर्षापासून गुणवंत कामगार विकास समिती आपल्या पिंपरी चिंचवड शहरात पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण काम करीत आहे.
यासाठी तळेगाव इंदुरी जवळील जांबे गाव पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीने दत्तक घेतले होते.
श्रमदान करून कामगारांनी तेथे रस्ते बनवले, एसटी महामंडळाला अर्ज सादर करून त्या गावासाठी एसटी ची सुविधा उपलब्ध करून दिली. तिथल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप नियमित केले.”
पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे आण्णा जोगदंड म्हणाले “पिंपरी चिंचवड महापालिकेने पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे आणि कॉम्रेड रुपमय चटर्जी यांच्या नावाने साहित्य कला दालन शहरात उभे केले पाहिजे.”
पद्मश्री नारायण सुर्वे, कॉम्रेड रुपमय चटर्जी यांचे विचार लोकाभिमुख होण्यासाठी सर्व कामगारांनी मोलाची भूमिका बजावली पाहिजे.”
शिवाजीराव शिर्के आणि अरुण पवार यांनीही विचार व्यक्त केले.
गुणवंत कामगार सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.
वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.