ताज्या घडामोडीपिंपरीमावळ

अजितदादा शब्दाला पक्के, कार्यकर्त्यांनीही विजयी होणाऱ्या उमेदवाराचेच काम करावे – श्रीरंग बारणे

Spread the love

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बारणे यांच्या विक्रमी विजयाचा निर्धार

टीका करण्याऐवजी विरोधी उमेदवाराने केलेले काम दाखवावे – बारणे

रावेत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाला पक्के आहेत. त्यांनी महायुतीला शब्द दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील विजयी होणाऱ्या उमेदवाराचेच काम करून स्वतःच्या राजकीय भविष्याची काळजी घ्यावी, असा सल्ला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) दिला.

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रावेत येथे आयोजित करण्यात आलेल्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल तथा नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर योगेश बहल, कार्याध्यक्ष श्याम लांडे तसेच प्रशांत शितोळे, संतोष बारणे, फजल शेख, महमंदभाई पानसरे, शेखर काटे, कविता अल्हाट, वैशाली काळभोर, नारायण बहिरवाडे, वर्षा जगताप, श्रीधर वाल्हेकर, विशाल वाकडकर, गोरक्ष लोखंडे, विशाल काळभोर, कैलास बारणे, राजेंद्र जगताप, मोरेश्वर भोंडवे, शमीम पठाण, विनोद नढे आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे सरकार पुढील दहा ते पंधरा वर्षे राहणार असल्यामुळे अजितदादांनी योग्य वेळी, योग्य निर्णय घेतला आहे. अजितदादांनी मावळात प्रामाणिकपणे राष्ट्रवादीची ताकद माझ्या पाठीशी उभी केली आहे. आम्हा दोघांमध्ये खूप चांगला समन्वय आहे. मावळात माझा विजय निश्चित आहे. मावळातील प्रत्येक घडामोडीवर अजितदादा व पार्थ पवार यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा कोणता कार्यकर्ता वेगळा विचार करीत असेल तर त्याने फेरविचार करावा. विजयी होणाऱ्या उमेदवाराची साथ देणे कधीही फायद्याचे ठरते. त्यामुळे विजयी होणाऱ्या उमेदवाराचे काम करण्यास प्राधान्य द्या.

आता बैठका- मेळावे घेण्यापेक्षा कार्यकर्ता घराघरापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे, असे सांगून बारणे म्हणाले की, मतदार हुशार असल्यामुळे चिन्ह हा विषय अडचणीचा ठरत नाही. जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये महायुतीचे कार्यकर्ते घड्याळाचाही प्रचार करत आहेत.

विरोधी उमेदवाराने नुसतीच टीका करण्याऐवजी त्यांनी केलेली विकास कामे जनतेला दाखवावीत, असे आव्हान बारणे यांनी यावेळी दिले. आपल्याला महायुतीत काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपले सहकार्य मिळेल, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एकत्र काम करूयात, माझ्याकडून कोणालाही त्रास होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार बारणे हे अनुभवी व विकासाचे राजकारण करणारे नेते आहेत, असे अजित गव्हाणे म्हणाले. अजितदादा यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बारणे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करतील. अजितदादांची ताकद वाढली तरच आपली ताकद वाढणार आहे. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेल्या वेगळ्या प्रचाराला उत्तर द्या आणि फक्त धनुष्यबाणाचेच काम करा. अजितदादा व पार्थ पवार तो दोघेही सातत्याने मावळ मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. खासदार बारणे हे जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील यासाठी प्रयत्न करणे, हाच आपला महायुतीचा धर्म आहे.

नाना काटे, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, शमीम पठाण, राजेंद्र जगताप, विनोद नढे यांनीही यावेळी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button