तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख पदांच्या निवडी जाहीर, पालखी सोहळा प्रमुख पदी ह. भ. प. विशाल महाराज मोरे, ह. भ. प. संतोष महाराज मोरे, ह. भ. प. माणिक महाराज मोरे
देहू, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे २८ जून रोजी श्रीक्षेत्र देहू नगरीतून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे नामजयघोषात लाखो वारकरी भाविकांचे उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रथापरंपरांचे पालन करीत तीन मान्यवर विश्वस्ताची पालखी सोहळा प्रमुख पदावर निवड जाहीर करण्यात आली आहे.
श्री तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्या निमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानची बैठक अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी संस्थांनचे विश्वस्त उपस्थित होते. या बैठकीत सन २०२४ मधील पालखी सोहळा प्रमुख पदी ह. भ. प. विशाल महाराज मोरे, ह. भ. प. संतोष महाराज मोरे, ह. भ. प. माणिक महाराज मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे संस्थानचे ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी सांगितले.
या बैठकीस संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे, ह. भ. प. संजय महाराज मोरे,ह. भ. प. भानुदास महाराज मोरे, ह. भ. प. अजित महाराज मोरे आदी उपस्थित होते. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज ३३९ व्या आषाढी पायी वारीचे श्रीक्षेत्र देहूगाव मंदिरातून शुक्रवार ( ता.२८ जून ) जेष्ठ कृष्ण सप्तमीला दुपारी २ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यानुसार देहू संस्थानचे वतीने पालखी सोहळा प्रस्थान पूर्व तयारीला सुरुवात झाली आहे. वारकरी भाविक भक्तांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. प्रस्थान सोहळा समीप आल्याने वारकरी भाविक भक्तांच्या मध्ये पालखी सोहळ्याचे कार्यक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे.