लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा , आणि त्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदान जनजागृती साठी सहकार विभागाचे अधिकारी गृहनिर्माण संस्थां फेडरेशन पदाधिकारी यांच्या समवेत जनजागृती अभियानाचे आयोजन आचार्य अत्रे सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त अण्णा बोदडे , निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे , सहकार विभागाचे उप निबंधक शीतल पाटील, नागनाथ कणजेरी यांची उपस्थिती होती. प्रत्येक सोसायटीच्या चेअरमनने सोसायटीत राहणाऱ्या सर्व सभासदांना भेटून मतदान करण्याबाबत माहिती द्यावी. यासोबतच प्रत्येक सोसायटीमध्ये मतदान जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल असे ही ते म्हणाले.
मतदान जनजागृती अभियानाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मतदान व्हावे असा हेतू आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीची टक्केवारी सरासरी ५५ ते ५८ एवढी होती. ही टक्केवारी अतिशय कमी आहे. परंतु मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी काही योजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे. यावर्षी आपल्या परिसरात मतदान सोमवार , १३ मे रोजी आहे. म्हणजेच शनिवार, रविवार आणि सोमवारी सुट्टी लक्षात घेता मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदान केंद्र माहिती कक्ष सुरू करण्यात येणार आहे. येत्या १ मे ते १३ मे दरम्यान ही सुविधा मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचे आदेश निर्गमित केल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवू, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल. यासोबतच मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवू असे उपनिबंधक नागनाथ कणजेरी यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविक उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तसेच उपस्थित असलेल्या सर्वांनी यावेळी मतदान करण्याबाबत शपथ घेतली.