महापालिकेच्या वतीने आयोजित क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२४ च्या तिसऱ्या दिवशी विविध कार्यक्रम संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टीजवळील मैदानात करण्यात आले आहे. या विचार प्रबोधन पर्वाच्या तिसऱ्या दिवशी टीम डिव्हाईनच्या वतीने मतदान जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांनी मतदानाची शपथही घेतली.
या कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, टीम डिव्हाईनचे निखिल भोसले, प्रमोद फंदे, गणेश भिसे, राजवर्धन नाथभजन, रोशन खळगे, दिलीप पाडाळे, रितेश कडलक तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या लोकशाहीकडे पाहिले जाते. या लोकशाहीत सर्व मतदार राजा आहेत आणि देशाचे भविष्य घडवण्यात प्रत्येक मत हे खूप मोलाचे असून मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. या मतदानामुळेच आपल्या देशाची स्थिती बळकट होण्यास मदत होईल. मतदानाच्या दिवशी घरातून बाहेर पडणे आणि मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. नागरिकांनी मतदान करून मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही आणखी बळकट करावी. प्रत्येकाचे मत हे खुप अनमोल असून याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. तसेच देशातील श्रीमंत, गरीब प्रत्येक माणसाच्या मताची किंमत ही एकच आहे, असा मोलाचा संदेश या पथनाट्याद्वारे देण्यात आला.
दरम्यान, क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाच्या तिसऱ्या दिवशी स्थानिक कलाकारांच्या गीतगायनाने दिवसाची सुरूवात झाली. स्थानिक कलाकारांनी गीतगायनाच्या माध्यमातुन महामानवांची गौरवगाथा उपस्थितांसमोर मांडली.
दुपारी निर्माते तथा गायक कबीर नाईकनवरे यांचा संगीत आणि निवेदनातून प्रबोधनात्मक गीतांचा जलसा – सलाम संविधान हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात संविधानाची मुल्ये जपण्याचा मोलाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
त्यानंतर ख्यातनाम लोकगायिका कडूबाई खरात यांचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या पहाडी आवाजातील भीमगीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी कडूबाई खरात यांनी सोन्याने भरली ओटी, भीम विचारांची शाई, केली भीमाने एकच सही इ. भीमगीते सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
यावेळी प्रसिद्ध गझलकार अशोक गायकवाड यांची रथ भीमाचा हा नेऊ पुढे या गझल गीतांच्या सुरेल मैफिलीचेही आयोजनही करण्यात आले. या मैफिलीमध्ये अशोक गायकवाड यांनी महामानवांचे विचार प्रत्येक प्रेक्षकाच्या मना-मनापर्यंत पोहोचविले.
सायंकाळी स्वरांगण दृष्टीहीन संस्थेतील अंध कलाकारांतर्फे जिनिअस स्टार्स हा गीतगायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये भारत लोणारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादाई विचारांचा आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा जागर केला.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी म्हणजे रविवार १४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता मुंबई विद्यापिठाचे संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. कुणाल इंगळे यांच्या धम्मपहाट या कार्यक्रमाने दिवसाची सुरूवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता प्रबोधनपर्वामध्ये वीर बापूराव शेडमाके आदिवासी नृत्य पथक यांच्या वतीने आदिवासी कलानृत्यातून महामानवांना अभिवादन करण्यात येणार आहे. यामध्ये संजय उईके, स्नेहा चिमूरकर आणि सहकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. सकाळी ९.३० वाजता वंदना व समता सैनिक दलाच्या वतीने महामानवांना मानवंदना देण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता प्रबोधनकार तथा कव्वाल विनोद फुलमाळी यांचा स्मरण युगंधराचे हा प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानंतर १०.१५ वाजता एकता कर्मचारी संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सकाळी १२ वाजता संगीतमय अविष्कार.. गौरव भीमरायाचा या कार्यक्रमात विविध संगीत वाद्यातून आणि शिल्पकलेतून महामानवांना अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जयेंदू मातोश्री प्रोडक्शन आणि शिल्पकार उत्तम साठे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी २ वाजता सिनेपार्श्वगायक मुज्तबा अजीझ नाझा यांच्या कव्वालीच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता सुप्रसिद्ध पंजाबी गायिका गिन्नी माही यांच्या गीतांची संगीतमय मैफिल आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ६ वाजता सिनेपार्श्वगायक तसेच बिग बॉस फेम डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांचा भिमगीतांचा लाईव्ह कॉन्सर्ट – शिंदेशाही हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रात्री ८.३० वाजता ख्यातनाम गायक, संगीतकार, सिनेकलाकार नंदेश उमप यांच्या महामानवांच्या गीतांचा महाजलसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.