ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरीसांस्कृतिक

“उद्योजक हे भारताचे भाग्यविधाते!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “उद्योजक हे भारताचे भाग्यविधाते आहेत!” असे गौरवोद्गार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे आयोजित जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात गिरीश प्रभुणे बोलत होते. आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संतोष मेदनकर (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार), शरयू शेटे (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगसखी पुरस्कार), सुरेश भाकरे (भारतरत्न जे. आर. डी. टाटा कृषिभूषण पुरस्कार), कुणाल पवार (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगमित्र पुरस्कार), सुरेश पठारे (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगभूषण पुरस्कार) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले; तसेच मुकुंद पवार यांना विशेष कला सन्मान प्रदान करण्यात आला.

पद्मश्री गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “उद्योजक हे एक प्रकारचे समाजसेवकच असतात. जग सतत बदलत असताना जागतिक दर्जाचे उत्पादन करण्याचे आव्हान समोर असते. त्यांच्या यशात कुटुंबीयांचे योगदान असते. भारतीय तरुणांना उद्योगात यावेसे वाटते, हे आशादायक चित्र आहे!” सचिन ईटकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “आत्मनिर्भर भारताची पहिली चळवळ जे. आर. डी. टाटा यांनी सुरू केली. आपल्या कृतीतून त्यांनी तरुणाईला धाडसाचे धडे दिले. देशात उद्योजकतेची मूल्ये रुजवली. त्यामुळे तरुणांनी आणि उद्योजकांनी त्यांना आदर्श मानले पाहिजे!” असे आवाहन केले. मनोहर पारळकर यांनी, “उद्योगात सचोटीला खूप महत्त्वाचे स्थान असते!” असे मत व्यक्त केले. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविकातून, “अनुभवातून निर्णय, निर्णयातून प्रगती तसेच श्रीमंती वाढते!” असे विचार मांडले.

श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘जे. आर. डी. टाटांना अभिप्रेत असलेला एकविसाव्या शतकातील उद्योजक’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. सायली संत यांनी सादर केलेल्या ‘माणुसकीच्या गीता’ने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. वर्षा बालगोपाल यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. प्रभाकर वाघोले यांनी मानपत्राचे वाचन केले. परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, अरुण गराडे, फुलवती जगताप, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजन केले. मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. जयवंत भोसले यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button