अनेक वर्षापासून मतदानापासून वंचित राहिलेले बेघर नवोदीत मतदार यंदा प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तसेच निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत,त्याचाच एक भाग म्हणून आज बेघर नवोदीत मतदारांना मतदान कार्ड वाटप करण्यात आले.
“गेले ४०-५० वर्षे मतदानापासून वंचित राहिलेल्या आणि सावली निवारा केंद्रात वर्षापासून राहून यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवोदित मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करून लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे” असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी केले.
पिंपरी चौक येथे महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सावली निवारा केंद्र येथे ४५ बेघर व्यक्ती राहतात की ज्यांनी यापूर्वी मतदान केले नाही अशा व्यक्तींना या संस्थेचे एम.ए. हुसेन यांनी मतदान कार्ड काढण्यासाठी मदत करून योगदान दिले, त्या नवोदीत मतदारांचे अभिनंदन करणे व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी त्या केंद्रास भेट दिली.
या कार्यक्रमास तहसीलदार जयराज देशमुख,नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप,प्रफुल्ल पुराणिक, संस्थेचे संचालक एम. ए. हुसैन, व्यवस्थापक गौतम थोरात, सचिन बोधनकर,सामाजिक कार्यकर्त्या अग्नेश फ्रान्सिस,काळजी वाहक मिलिंद माळी, उमा भंडारी, लक्ष्मी कांबळे, लक्ष्मी वायकर ,अमोल भाट यांच्यासह ४५ नवोदीत मतदार उपस्थित होते.
अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना सर्व प्रकारची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यांच्यासाठी व्हीलचेअर, प्रसंगी वाहन व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ४५ नवोदीत मतदारांनी मतदानाची शपथ घेऊन या निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
यावेळी नवोदीत मतदारांनी प्रथमच मतदान करण्यात येणार असल्याने समाधान व्यक्त केले आणि इतरांनाही मतदान करण्याचा संदेश दिला.