बळीराजा समवेत खासदार बारणे यांनी अनुभवला बैलगाडा शर्यतीचा थरार
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडेचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) दुपारी भेट दिली आणि बळीराजाबरोबर बैलगाडा शर्यतीचा थरारही अनुभवला.
खासदार बारणे यांनी तळेगाव येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटाला भेट दिली त्यावेळी त्यांच्या समवेत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे तसेच नवनाथ हारपुडे, सुनील हागवणे, राम सावंत, दत्ता चोरगे, सुनील तथा मुन्ना मोरे आदी पदाधिकारी होते.
श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन काकडे, सरचिटणीस सुधीर सरोदे, खजिनदार प्रणव दाभाडे, प्रसिद्धी प्रमुख स्मितेश भेगडे यांनी खासदार बारणे यांचे स्वागत केले.
बैलगाडा शर्यत हा बळीराजाच्या आनंदाचा खेळ आहे. तळेगावच्या घाटावर सुमारे साडेतीनशे बैलगाडे धावत आहेत. त्याचा आनंद सर्वांनी घ्यावा, असे नमूद करून खासदार बारणे यांनी सर्वांना गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी गाडा मालक व गाडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.