ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्रमावळ

‘अब की बार चार सौ पार’च्या घोषणांमध्ये पनवेलमध्ये भाजपकडून बारणे यांचे स्वागत

Spread the love

पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’ अशा घोषणा देत, फटाक्यांची आतषबाजी करीत पनवेलमधील भाजप कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार बारणे यांनी प्रथमच पनवेल येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदींनी त्यांचे स्वागत केले व तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल सत्कार केला. त्यावेळी बाळासाहेब पाटील, रामदास शेवाळे, नितीन पाटील, परेश ठाकूर, अनिल भगत, अरुण भगत, वाय. के. देशमुख, प्रथमेश सोमण, चंद्रशेखर सोमण, रमेश घोडेकर,  प्रवीण मोहकर आधी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामशेठ ठाकूर म्हणाले की, यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांपेक्षा यावेळी वातावरण फार चांगले आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार एकत्र आल्यामुळे महायुतीची ‘महाशक्ती’ झाली आहे.

खासदार बारणे यांना घाटावर मिळणाऱ्या मताधिक्यात कोकणातील तिन्ही मतदारसंघ मोठी भर घालतील व बारणे तीन ते साडेतीन लाखांच्या विक्रमी आघाडीने जिंकतील, असा विश्वासही रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेले काम सर्वसामान्यांपर्यंत पोहचले आहे. या सर्व लाभार्थींपर्यंत पोहोचण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. त्या कामाच्या जोरावर बारणे यांना पनवेलमधून विक्रमी मताधिक्य मिळेल. चिंचवडपेक्षाही जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

मागील दोन्ही निवडणुकांमध्ये दिलेल्या साथीबद्दल खासदार बारणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. गेल्या दहा वर्षांमध्ये आपण पनवेल, कर्जत व उरण या भागात सातत्याने संपर्कात राहून विकासकामांना गती दिली आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे काही काळ विरोधात बसावे लागले, मात्र आपण कधीही कटुता निर्माण होऊ दिली नाही. पनवेलचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहेत. त्यामुळे विक्रमी मताधिक्य मिळेल याबाबत कोणतीही शंका नाही, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रास्ताविक केले. नितीन पाटील यांनी आभार मानले. प्रवीण मोहकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button