मावळ लोकसभेसाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी द्यावी – सचिन काळभोर
पिंपरी-चिंचवड भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवदेन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील शेळके आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सुनील शेळके यांनी नुकतंच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना आगामी लोकसभेच्या उमेदवारीवरून विरोध दर्शवला. त्यापाठोपाठ माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दंड थोपाटले असून, बाळा भेगडे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत. याच पार्श्वभूुमिवर आता मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीची जागा भाजपलाच मिळावी. विशेष म्हणजे ही उमेदवारी भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांना मिळावी. शंकरशेठ यांची लोकप्रियता तसेच पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष म्हणून करत असलेले कार्य याचा विचार करून त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय मताधिक्याने तर निश्चित होईलच. शिवाय महायुती तसेच भाजपाला विशेष फायदा होईल, अशा मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिंपरी-चिंचवड भाजपा शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी दिले आहे.
सदर निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, 2014 साली स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी शेकापकडून मावळ मतदार संघाची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना भरघोस मतदान मिळाले होते. याचाही फायदा पक्षाला तसेच महायुतीला होऊ शकतो. त्यामुळे शंकरशेठ जगताप यांना मावळ लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी जाहीर करण्यात यावी.