पुन्हा असा प्रकार घडल्यास तर गाठ मनसेशी; मनसेचा शाळा प्रशासनाला इशारा!
शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही लावल्याचा प्रकार आला होता उघडकीस
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील जयहिंद हायस्कूलमध्ये मुले व मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दरम्यान मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत शाळेची पाहणी केली व शाळा प्रशासनाला ‘पुन्हा असा प्रकार घडल्यास तर गाठ मनसेशी राहील, असा इशारा दिला. यावेळी शाळा प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे हटविण्यात आले असल्याची माहिती दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,पिंपरी चिंचवड शहरातील जयहिंद हायस्कूलमधील स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचा व्हिडिओ सामाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर विविध माध्यमातून याबाबत तीव्र आक्षेप घेण्यात आले. तर पालकांनीही याला विरोध केला होता. याबाबत विचारणा करण्यासाठी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला शहराध्यक्ष सीमा बेलापूरकर, नितीन चव्हाण, मनोज लांडगे, तुषार सोनटक्के, अंकित शिंदे, अक्षय देसले, देवेंद्र निकम, शंकर तरपडे व पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. संपुर्ण शाळेची पाहणी केल्यानंतर स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे मुलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचा आरोप करत मनसे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान,’शाळेत पुन्हा असा प्रकार घडल्यास तर गाठ मनसेशी राहील, असा इशारा देण्यात आला. यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की, शाळेत असे प्रकार घडणे अत्यंत संतापजनक आहे. शिक्षणाचे माहेर घर म्हणून लौकिक मिळविलेल्या पुण्यात असे प्रकार सहन केले जाणार नाहीत. शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी मनसे सदैव तत्पर आहे.शिक्षण विभागाने या गैर प्रकाराची तात्काळ दखल घेत कारवाई करावी,अशी मागणी सचिन चिखले यांनी केली.
…अखेर शिक्षण विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे हटविले
पिंपरी चिंचवड शहरातील जयहिंद हायस्कूलमधील स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिंपरी महापालिकेच्या शिक्षण विभागालाही खडबडून जाग आली. प्रशासनाने शाळेत जात तेथील कॅमेरे हटवले आहेत. तसेच शाळेला याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.