इंद्रायणीकाठी पुन्हा एकदा मृत माशांचा खच
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी नदी प्रदूषण ठिकठिकाणी वाढत आहे. आळंदी येथे इंद्रायणी अनेक दिवसांपासून फेसाळत असतानाच देहू येथे नदी प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत पावत आहेत. आज (बुधवारी, दि. 13) सकाळी मृत माशांचा खच इंद्रायणी नदीत पहायला मिळाला.
देहूगाव येथे इंद्रायणी नदीच्या काठावर बुधवारी सकाळी नागरिक फिरायला गेले असता त्यांना कापूरवडा येथे शेकडो मासे मृत पावलेले आढळून आले. इंद्रायणी नदीत आजवर वाम, मरळ, चीलापी असे मासे आजवर आढळत होते. मात्र या नदीत देवमाशांसारखे दुर्मिळ मासे देखील असल्याचे आजच्या घटनेवरून निदर्शनास आले आहे.
बुधवारी मृत झालेल्या माशांमध्ये देवमासे देखील मरण पावले आहेत. इंद्रायणी नदी पात्रात ठिकठिकाणी जलपर्णी वाढली आहे. तिथे माशांना पाण्याच्या वरच्या भागात येता येत नाही. त्यामुळे मासे जलपर्णी कमी असलेल्या कापूरवडा परिसरात आले. मात्र या ओढ्यातून शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे.
इंद्रायणी नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच नायट्रोजनचे प्रमाण अनेक पटींनी वाढलेले आहे. हा नायट्रोजन जलचरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतो. नायट्रोजनमुळे या पाण्यात माशांचा जीव गेला आहे.
नदी प्रदूषण कमी करणे तसेच नदीला पुनर्जीवित करण्यासाठी काम करणारे आबा मसुडगे म्हणाले, “मागील काही दिवसांपूर्वी आम्ही स्थानिक प्रशासनाला नदी प्रदूषणाबाबत माहिती दिली होती. मात्र प्रशासन याबाबत काहीही कारवाई करत नाही. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे जलचरांना आपला जीव गमवावा लागत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचेही मसुडगे यांनी सांगितले.