ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण
महिला सक्षमीकरणासाठी समाज प्रबोधन आवश्यक – ममता सपकाळ
पीसीईटीच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतात गेल्या काही वर्षांत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल झाले. अनेक क्षेत्रांत पुरुषांप्रमाणे महिलांनी आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मात्र, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी महिला सक्षमीकरणाला अधिक प्राधान्य देण्याची गरज असून त्यासाठी समाज प्रबोधन करण्याची गरज आहे असे मत सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सपकाळ यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डिव्हाईन एचआर फोरमने पीसीईटीच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ‘महिलांना संधी द्या, प्रगतीचा वेग वाढवा’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, डॉ.राखी मुथा, पल्लवी शिकुमारश्री, डॉ. प्रिया पारेख, संगिता तरडे, प्रियांका शाक्यवान, ॲड. प्रितिसिंग परदेशी, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणाचे महत्त्व आणि प्रगतीला चालना देण्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे. महिलांनी काळाची गरज ओळखून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन प्रगती केली पाहिजे. एक मुलगी शिकली की संपूर्ण कुटुंब शिक्षीत होते, असे डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
परिसंवादात सहभागी वक्त्यांनी महिला सक्षमीकरणावर भर देत त्यांच्या कार्य, कर्तृत्वावर प्रकाश टाकला. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सहभागी महिलांना सन्मानित करण्यात आले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
डॉ. इरम अन्सारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन राजनंदिनी सावलकर, सिमंथिनी पुरणकर, प्रीती साखरे यांनी केले. आभार डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी मानले.