ताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक

“आज जमिनी विकतील तर उद्या काय खातील?” – सरस्वती खंडू भोंडवे

Spread the love

*यशवंत – विठाई सन्मान सोहळा

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “आज जमिनी विकतील तर उद्या काय खातील?” असे परखड मत मातोश्री सरस्वती खंडू भोंडवे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या यशवंत – विठाई सन्मान सोहळ्यात चिंचवड येथे व्यक्त केले.

रावेत येथील कृषिनिष्ठ शेतकरी शांताराम खंडू भोंडवे आणि त्यांच्या मातोश्री सरस्वती खंडू भोंडवे यांना ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, कृषिभूषण उद्योजक सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री गणेश रोडलाईन्सचे संचालक तेजस डेरे (यशवंतराव चव्हाण उद्योगभूषण पुरस्कार), कोयाळी, तालुका खेड येथील स्नेहबन संस्थेच्या अशोक देशमाने यांना (यशवंतराव चव्हाण युवा सन्मान) प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी आणि एम पी सी न्यूजच्या मुख्य संपादकपदी नियुक्ती झाल्याप्रीत्यर्थ ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी, “यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसदार सध्याच्या राजकारणात कोणीही दिसत नाही!” अशी खंत व्यक्त करून, “यशवंतराव चव्हाण हे व्यक्तिमत्त्व सर्व देशाला प्रेरक आहे. त्यांच्यासारखा सत्यपूजक नेता, व्यासंगी साहित्यिक, आदर्श राजकारणी आणि बेरजेचे राजकारण करणारा द्रष्टा धुरंधर पुन्हा होणे नाही!” असे गौरवोद्गार काढले. किसनमहाराज चौधरी यांनी, “यशवंताचा यशवंतराव होण्यात विठाई यांचा मोठा वाटा होता. आजच्या पुरस्कारार्थींना जीवनाचा अर्थ उमगला आहे!” असे विचार मांडले. सुदाम भोरे यांनी, “आईवडिलांचा शब्द पाळा!” असे आवाहन केले.

इना या जपानी युवतीच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कामगारभूषण राजेंद्र वाघ यांनी नितीन देशमुखलिखित ‘यशवंतराव’ या गीताचे गायन केले. सुरेश कंक यांनी प्रास्ताविकातून, “यशवंत – विठाई हा अनुबंध श्याम आणि श्यामची आईप्रमाणे आहे!” अशी भावना व्यक्त केली.

पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यामध्ये शांताराम भोंडवे यांनी, “काळ्या आईच्या सेवेतच खरा आनंद मिळतो!” अशी भावना व्यक्त केली. तेजस डेरे यांनी व्यावसायिक होण्याची प्रेरणा घरातूनच मिळाली, अशी माहिती दिली; तर अशोक देशमाने यांनी, बाबा आमटे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि ‘स्नेहवन’च्या माध्यमातून ५० विद्यार्थ्यांचे संगोपन आई आणि पत्नीच्या मदतीने करतो आहे, असे नमूद केले. अनिल कातळे यांनी, “यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने मिळालेला विशेष सन्मान म्हणजे समाजमान्यतेची मोहोर आहे!” अशी कृतज्ञता व्यक्त केली.

पुरस्कार वितरणाच्या प्रारंभी श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘यशवंतराव इतिहासाचं एक पान…’ या छोटेखानी व्याख्यानातून भावोत्कट शब्दांतून यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट साकारला. वर्षा बालगोपाल यांनी मानपत्राचे वाचन केले. संगीता झिंजुरके यांनी “वाद नसाया पाहिजे…” या स्वरचित गीताचे गायन केले.

मुरलीधर साठे, एकनाथ उगले, सुप्रिया सोळांकुरे, प्रभाकर वाघोले, फुलवती जगताप, मुकुंद आवटे, सायली संत, अरुण गराडे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले. देवकी भोंडवे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button