महिलांसाठी स्वच्छता हीच संपन्नता – अनिता संदीप काटे
महिला दिनानिमित्त कार्यशाळेत मार्गदर्शन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -कौटुंबिक जबाबदा-या पार पाडत असताना महिलांना स्वतःकडे वेळ द्यायला फुरसत मिळत नाही. त्याचा परिणाम मानसिकतेवर होऊन मनाचे खच्चीकरण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे महिलांनी सर्वात अगोदर आपले मासिक स्वास्थ जपले पाहिजे. त्याचबरोबर सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. जीवनात स्वच्छता हीच संपन्नता असते, असे मार्गदर्शन चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या उपाध्यक्षा अनिता काटे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे महिलांचे मासिक स्वास्थ आणि स्वच्छता जनजागृती कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अनिता काटे बोलत होत्या. यावेळी निहारा काटे, लीना काटे यांच्या प्रमुख उपस्थितीसह पालक प्रिया बिरारी, अर्चना महिते व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
अनिता काटे म्हणाल्या, जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनीच महिलांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक वेळी त्रुटी शोधण्यापेक्षा इतर महिलांना सामावून घेऊन प्रत्येक महिलेचा सन्मान कसा उंचावेल यासाठी योगदान दिले पाहिजे. तसेच, मासिक स्वच्छतेबरोबर मानसिक सुदृढता देखील गरजेची आहे, हे महिलांनी विसरुन चालणार नाही. कारण, कौटुंबिक जबाबदा-या सांभाळत असताना मनाचे खच्चीकरण झाल्यास त्याचा परिणाम शरिरावर पडतो. परिणामी, शारिरीकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या स्त्रियांची अधोगती होण्यास सुरुवात होते. त्यासाठी आपले आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण कुटुंबाला वेळ देऊ शकतो, असेही सौ. काटे यावेळी म्हणाल्या.
चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या उपमुख्याध्यापिका सुविधा महाले, दैव्यानी शिंदे व शिक्षक यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.