ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण
शिक्षणाबरोबरच खेळाला ही महत्त्व द्या – डॉ. नीलकंठ चोपडे
पीसीईटीच्या एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेज मध्ये माईंड गेम्स स्पर्धा संपन्न
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाला ही महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते, असे प्रतिपादन पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिजाईन येथे माईंड गेम्स इनडोअर स्पोर्ट्स स्पर्धांच्या उद्घाटन डॉ. चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम व स्पॉट स्केचिंग आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिजाईनचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग, सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. पुणे व पिंपरी चिंचवड मधील आर्किटेक्चर महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
शैक्षणिक प्रगतीसह व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास योग्य प्रकारे साधण्यासाठी खेळांची उपयुक्तता आहे. यातूनच भविष्यातील सक्षम, सुदृढ, उच्च शिक्षित पिढी घडविण्यास मदत होईल, असे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
पारितोषिक वितरण समारंभ आर्किटेक्ट महेंद्र ठाकूर, आर्किटेक्ट निखिलेश गरुड यांच्या हस्ते झाला. यामध्ये कॅरम स्पर्धेत अमोघ केंकरे व आदित्य पवार (पीवीपी कॉलेज), बुद्धिबळ स्पर्धेत मृण्मयी गोतमारे (एमआईटी कॉलेज), टेबल टेनिस स्पर्धेत अमोघ केंकरे व ओम तौर (पीवीपी कॉलेज) आणि स्केचिंग स्पर्धेत श्री गोगावले (आयोजन कॉलेज) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन प्रशांत साबळे, सुकन्या गावडे यांनी केले. प्राचार्य डॉ.महेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्किटेक्ट नेहा अनवाने, ऋतुराज कुलकर्णी, शिवा शिसोदिया, शिक्षकेतर कर्मचारी, स्टुडंट्स कौन्सिल तर्फे प्रथमेश जाधव, शशांक सस्ते आणि विद्यार्थ्यांनी संयोजन केले.