“श्रीराममंदिर हे खरे राष्ट्रस्मारक!” – राहुल सोलापूरकर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “लाखो रामभक्तांच्या रक्तसिंचनातून उभे राहिलेले श्रीराममंदिर हे खरे राष्ट्रस्मारक आहे!” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते आणि ज्येष्ठ व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे पाच दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवशंभो व्याख्यानमालेत ‘श्रीराममंदिर : इतिहास राष्ट्र उभारणीचा’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना राहुल सोलापूरकर बोलत होते. माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, पिंपरी – चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, व्याख्याते राजेंद्र घावटे, अभिनेते अविनाश आवटे, उद्योजक लक्ष्मण टक्केकर, बजरंग गडदे, कामगारनेते किशोर सोमवंशी, पांडुरंग पाटील, विनोद खुरांगळे, प्रशांत पोमण, कैलास दुर्गे, विलास सपकाळ, महेंद्र पाटील, शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे, अध्यक्ष संजय तोरखडे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले की, “बाबरापासून अयोध्येचा इतिहास सांगितला जात असला तरी अपौरुषेय वेदांमध्ये आणि ब्रह्मांड पुराणात अयोध्येचा उल्लेख आहे. वाल्मीकी रामायणात श्रीरामाने स्वर्गाहून सुंदर असे वर्णन केलेली अयोध्या युद्ध करूनदेखील कोणालाच कायमस्वरूपी जिंकता आली नाही. इसवीसन पूर्व १५० वर्षांपूर्वी ग्रीकांनी अयोध्येवर पहिले आक्रमण केले. तेव्हापासून सुमारे ७९ लढाया आणि पाच लाख हिंदूंचे हौतात्म्य पत्करून अयोध्येतील श्रीराममंदिर उभे राहिले आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी अपेक्षित धनाहून सहापट जास्त रक्कम जमा झाली. त्यामुळे त्याच्या व्याजातून मंदिर उभे राहिले आहे. ७.५रिश्टर स्केलचा धक्का सहन करून किमान एक हजार वर्षे हे मंदिर टिकेल, असा स्ट्रक्चरल ऑडिटने निर्वाळा दिला आहे. सहसा कधीही संघटित न होणारे हिंदू यासाठी एकत्र आले हा इतिहास पुढील पिढीपर्यंत आपण पोहचवला पाहिजे!”
केशव घोळवे यांनी प्रास्ताविकातून, “गेल्या दोन तपांपासून ‘जेथे शुद्ध आचार, विचार आणि कृती; तेथे देवाची प्रचिती’ हे ब्रीद उराशी बाळगून शिवशंभो फाउंडेशन कार्यरत आहे!” अशी माहिती दिली. राजेश हजारे, सविता बारवकर, काळुराम साकोरे, संजय देशमुख, कैलास पोखरकर, रूपाली पवार, विकास शेवाळे यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश आवटे यांनी आभार मानले.