ताज्या घडामोडीपिंपरी
चिमुरड्यांनी प्रेक्षकांना नेले चॉकलेटच्या बंगल्यात
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कॅडबरीच्या वेष्टणाची वेषभूषा केलेल्या चिमुरड्यांनी “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…” या कवितेवर आकर्षक पदन्यास करीत, उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला.
निमित्त होते लर्निव्हर्स स्कूलच्या किवळे, चिंचवडेनगर, रावेत, गहुंजे आणि चिंचवडगाव या पाच शाखांच्या पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे! आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात बुधवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न झालेल्या या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी महापौर झामाबाई बारणे, युवासेना प्रमुख राजेंद्र तरस, माजी नगरसेवक शेखर चिंचवडे, सिद्धेश्वर बारणे, सिद्धी समाधी योगचे संजय ठक्कर, भाषा अकॅडेमीचे संस्थापक दीपक पागे, सामाजिक कार्यकर्ते विश्वजित बारणे, किरण चिंचवडे आणि संस्थापिका प्रियंका नलावडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
“देश मेरा रंगिला…” या गीतावर भारतातील विविध राज्यांमधील पारंपरिक पेहराव परिधान करून नादमय पदन्यास करीत छोट्या मुलांनी सुंदर नृत्य सादर केले. त्यावेळी पार्श्वभूमीवर कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत असलेल्या वैविध्यपूर्ण ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविण्यात आले. ‘छोटा भीम’ या बच्चेकंपनीच्या आवडत्या कार्टून मालिकेमधील ‘छुटकी’ या पात्राच्या लडिवाळ आवाजातील निवेदनाच्या साथीने जंगल सफारी, चॉकलेटलॅण्ड, ड्रीमलॅण्ड अशा अद्भुत ठिकाणांची सफर घडवताना चिमुरड्यांनी आपल्या सामुदायिक सादरीकरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. “हवाकें झोके…” , “लुंगी डान्स…” आणि ऑस्कर विजेत्या “नाटू… नाटू…” या गीतांचा चपखल वापर, लहानग्यांची उत्स्फूर्तता, उत्साह आणि निरागसता प्रेक्षकांना मोहित करून गेली. विशेष बाब म्हणजे पालक दांपत्यांच्या नृत्याविष्काराने प्रारंभ आणि शिक्षिकांनी आपल्या मुलगा किंवा मुलगीच्या सोबत केलेल्या समूहनृत्याने झालेला समारोप कार्यक्रमाला कळसाध्यायकडे घेऊन गेला.
कार्यक्रमाच्या दरम्यान लर्निव्हर्स स्कूलच्या पाचही शाखांमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना जयश्री भोंडवे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे भाषा अकॅडेमीच्या वतीने लर्निव्हर्सच्या संस्थापिका प्रियंका नलावडे यांना दीपक पागे यांच्या हस्ते गौरविण्यात आले; तसेच शाखाप्रमुख प्रियंका चिंचवडे (चिंचवडेनगर), रोहिणी पडाळ (रावेत), श्वेता हंडाळ (चिंचवड), मोनिका देशपांडे (गहुंजे) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
उपप्राचार्या सौम्या नटराजन आणि व्यवस्थापक मेघा मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.