तळेगावमध्ये शनिवारी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही येत्या 2 मार्च रोजी कै. कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेंतर्गत शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक राष्ट्रोत्सव’ या विषयावर शिवचरित्राचे अभ्यासक प्रा.नितीन बानगुडे पाटील बोलणार आहेत. दरम्यान, सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या ओंकार विजय डोके (कनिष्ठ अभियंता पी.डब्लु.डी), सचिन लोखंडे (वरिष्ठ सहाय्यक लेखापाल जिल्हा परिषद कोल्हापूर) व प्रणव भेगडे (सी.डी.एस) यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उदघाट्न 2 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता सेवाधाम ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळचे आमदार सुनील शेळके असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पूना पीपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे, माजी नगराध्यक्ष कृष्णाजी करके, अॅड. रवींद्रनाथ दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, सावा हेल्थकेअरचे संचालक विनोद जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे व सर्व कार्यकारी मंडळाने केले आहे.