पवना नदीकाठी उत्तर भारतीय समाजाला छट पूजेसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्या – विजय गुप्ता
पवना नदीकाठी उत्तर भारतीय समाजाला छट पूजेसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्या..
राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची महापालिका आयुक्तांना सूचना..
छट पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांचा पाठपुरावा…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील पवना नदीकाठी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय समाज छट पूजा करू शकेल, एवढी जागा वर्षात केवळ दोन दिवसांसाठी (प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये) उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हनुमान मित्र मंडळ आणि छट पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांनी नुकतीच राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात अडीच लाख उत्तर भारतीय नागरिक वास्तव्य करीत आहेत. उत्तर भारतीय समाजाचे शहरातील विकासात मोठे योगदान आहे. समाजाचा धार्मिक कार्यक्रम ” छट पूजा ” हा सण इंद्रायणी आणि पवना नदीकाठी गेली ३० वर्षापासून नियमितपणे दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून चिंचवड परिसरात पवना नदीकाठी उत्सवासाठी तात्पुरती व्यवस्था केली जाते. परंतु, जागेअभावी आणि जमणाऱ्या असंख्य भक्तांच्या गर्दीमुळे येथील हॉटेल रिव्हरविव्ह जवळील पवना नदी घाट उत्सवासाठी अपुरा पडत आहे.
चिंचवड आणि पिंपरी मतदार संघातील मोहननगर, दळवीनगर, चिंचवड, काळभोरनगर परिसरातील हजारोंच्या संख्येने भक्त, भाविक या घाटावर छटपूजेला येतात. अपुऱ्या जागेमुळे वादविवाद होतो. शिवाय गर्दी होते. अपुऱ्या जागेमुळे अपघाताचीही शक्यता बळावते. या घाटाच्या अगदी उजव्या बाजूला शासनाची मोकळी पडीक जागा आहे. त्या जागेवर महापालिकेने नवा घाट विकसित करावा. शिवाय येथे नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक आणि पर्यटन स्थळही विकसित करता येऊ शकेल. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे शहराच्या वैभवातदेखील भर पडू शकेल. त्यामुळे आपण मागणीचा विचार करून चिंचवडगावातील हॉटेल रिव्हरविव्ह जवळील पवना नदी घाटाला पर्याय म्हणून अगदी त्याच्या उजव्या बाजूला नवीन घाट उभारणीच्या कामाला त्वरित मंजुरी द्यावी, असे या निवेदनात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे.
विजय आर गुप्ता यांच्या निवेदनावर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडून नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्यात यावी. केलेल्या कार्यवाहीची माहिती मला अवलोकनार्थ सादर करावी.
– मा. अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता – महाराष्ट्र विधानपरिषद
पवना नदी घाट विस्ताराबाबत नदी सुधार प्रकल्पात सर्वसमावेशक विचार केला जाईल.
– शेखर सिंह, आयुक्त – पिं. चिं. मनपा