मावळ लोकसभेतून गद्दार लढतील का? याची अद्याप खात्री नाही – आदित्य ठाकरे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पाच वर्षानंतर निवडणुका होतील की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं ही लोकसभा निर्णायक ठरणार आहे. लोकशाही संपविण्याचा, संविधान मोडीत काढण्याचा डाव या सरकारचा आहे. २०२३ मध्ये एक पक्ष फोडला, मग एक कुटुंब फोडलं. आता २०२४ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पाडली जात आहे.मावळ लोकसभेतून गद्दार लढतील का? याची अद्याप खात्री नाही, असे मत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
आदित्य ठाकरे आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन आहेर, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड मावळ संपर्क प्रमुख लतिका पाष्टे, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, ज्येष्ठ नेते एकनाथ पवार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनिताताई तुतारे, शहर युवा अधिकारी चेतन पवार, उपजिल्हाप्रमुख वैशाली मराठे, निलेश मुटके, धनंजय आल्हाट, तुषार नवले, अनंत कोऱ्हाळे, रोमी संधू, हाजी मणियार दस्तगीर, डॉ. वैशाली कुलथे, कल्पना शेटे, तुषार नवले, मिनल यादव आदींसह पक्षाचे उपशहरप्रमुख, संघटक, उपसंघटक, सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक या मेळाव्य़ास उपस्थित होते.
नेहरू, गांधी, काँग्रेसने ६५ वर्षांत काय केलं असं २०१४ पूर्वी म्हणणं योग्य होतं. पण आता हे म्हणतात ७५ वर्षात काँग्रेसने काय केलं? आता सांगा ही १० वर्षे भाजपकडे आहेत. त्यातील पाच वर्षे आपण त्यांच्यासोबत होतो, कारण अच्छे दिन येणार म्हणाले म्हणून आपण ही त्यांच्या प्रचार केला. मात्र अच्छे दिन आलेत का? महागाई किती वाढली आहे, बेरोजगारांच्या हाताला रोजगार आहे का? हे अंधभक्तांनी ही लक्षात घ्यावं. आज 370 कलम महाराष्ट्रावर लावलंय का? अशीच परिस्थिती सध्या आपल्या राज्यात निर्माण झालेली आहे.
मावळ लोकसभेतून गद्दार लढतील का? याची अद्याप खात्री नाही. तळेगाव मधून वेदांता हा उद्योग गुजरातला गेला तेव्हा मावळचे खासदार गप्प का होते? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. मावळ लोकसभा हा आपला हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आता येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच खासदार निवडून गेला पाहिजे. त्यासाठी आपण मैदानात उतरणार असल्याचे शेवटी बोलताना ते म्हणाले.