ताज्या घडामोडीपिंपरी

कवी शिवाजी चाळक ‘केशरमाती’ काव्य पुरस्काराने सन्मानित

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ज्येष्ठ कवी इंजि. शिवाजी चाळक यांना कविराज उद्घव कानडे यांच्या स्मरणार्थ पहिल्या ‘केशरमाती’ काव्य पुरस्काराने गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली येथे  सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, ह. भ. प. नारायणमहाराज जाधव, सासवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ – मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यवाह सुनीताराजे पवार, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, गणेश इंटरनॅशनल स्कूलचे प्रमुख एस. बी. पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातून वरिष्ठ अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ कवी शिवाजी चाळक हे सुमारे चाळीस वर्षांपासून काव्यलेखन करीत असून त्यांचे ‘अर्घ्य’ , ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ हे कवितासंग्रह तसेच ‘जंगल दंगल’ आणि ‘उंदरांचा टांगा’ हे बालकवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘नाणेघाटातील पाऊलखुणा’ या सुमारे १४० कवींच्या कवितांचा समावेश असलेल्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे संपादन त्यांनी केले आहे. याशिवाय विविध नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित झालेल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुमारे आठ वेळा कविता सादर करण्याची संधी त्यांना लाभली आहे; तसेच विविध साहित्य पुरस्कार आणि सन्मान यापूर्वी त्यांच्या वाट्याला आले आहेत. प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठीभाषा गौरवदिनाचे औचित्य साधून शिवाजी चाळक यांनी स्थापन केलेल्या शिवांजली साहित्यपीठ या संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय शिवांजली काव्यमहोत्सवाचे आयोजन केले जाते.
पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी ‘कॉम्रेड’ या कवितेचे सादरीकरण केले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर साठे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button