पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुलाच्या कामाचा अखेर ‘टेकऑफ’
– जमीन सपाटीकरणाच्या कामाला सुरूवात
– आमदार महेश लांडगे यांनी केली पाहणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीच्या कामाला आज अखेर सुरूवात झाली. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, जमीन सपाटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामाची भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाहणी केली.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते निखील बोऱ्हाडे, निलेश बोराटे आदी उपस्थित होते. शहरासाठी स्वतंत्र न्यायालय संकूल असावे आणि पक्षकार तसेच सर्वसामान्य नागरिकांना व विधीज्ञांना पुणे ऐवजी शहरातच खटल्यांचे कामकाज करण्याची सुविधा असावी या करिता आमदार महेश लांडगे यांनी २०१४ पासून सातत्त्याने पाठपुरावा केला. राज्य सरकारच्या मंजुरीसाठी विधानसभा अधिवेशनातील आवाज उठवला होता. पर्यावरण विभागासह राज्य सरकारच्या विविध विभागांची ना हरकत दाखला घेतल्यानंतर मोशी येथील सेक्टर १४ येथे इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली. त्याचे सपाटीकरण आता सुरू आहे.
दि. ८ मार्च १९८९ साली पिंपरी-चिंचवड न्यायालयाची स्थापना झाली. मात्र, अद्याप इमारतीचा प्रश्न मार्गी लागला नाही. पण, आमदार महेश लांडगे आणि पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या आजी-माजी अध्यक्षांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. त्याला यश मिळाले असून आता न्यायसंकुलाची इमारत दृष्टीक्षेपात आली आहे.
शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा…
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर संबंधित ठेकेदार आणि पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाबाबत सूचना केली. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. नवीन न्यायालय इमारतीमध्ये एकूण ९ मजले आणि अतिरिक्त सत्र न्यायालय होर आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात एकूण ४ मजले आणि २६ कोर्ट हॉल अशी सर्व सुविधायुक्त इमारत शहराच्या वैभवात भर घालणार आहे. शहरातील वकीलांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.
नवीन न्यायालयाच्या इमारतीमुळे भविष्यात पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा वाचेल. कामांना गती मिळेल. ही प्रशस्त इमारत पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा असेल, असा विश्वास वाटतो. पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी पाहिलेले आणखी एक महत्त्वाकांक्षी स्वप्न पूर्ण होत आहे, याचा विशेष आनंद आहे. पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी सकारात्मक भूमिका घेणारे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ‘महायुती’ सरकारचे तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड