ताज्या घडामोडीपिंपरीभोसरीमहाराष्ट्रमावळ

श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्यावतीने अखंड अन्नदान सेवा 

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोंगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अखंड हरीनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवास’ भाविकांची मोठी गर्दी होत आहे. आज पहाटेची काकडा आरती, अभिषेक, महापूजा संपन्न झाल्यानंतर गाथा पारायण झाले. दरम्यान, बुधवारी सायंकाळी ह.भ.प. रविदास महाराज शिरसाठ यांचे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्रावर तत्व चिंतनपर निरुपण झाले. तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (मोठे माऊली) यांनी अनेक दृष्ठांत सांगत संताच्या अवतार कार्याची महती निरुपणातून दिली. या मंदिर निर्माण कार्याला भाविकांनी देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.

“तुका भरवितसे उदार करे | देव जेविताती परमादरे” याप्रमाणे साक्षात पांडुरंगाला तुकोबारायांनी प्रसादाचा घास भरविला, ती ही पवित्र भंडारा डोंगराची भूमी. येथे येणा-या लाखो भाविकांची प्रसादाची व्यवस्था श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व माघ शुद्ध दशमी समितीच्यावतीने करण्यात आली असून, पश्चिम दिशेला मंदिराच्या मागील बाजूला ‘संत तुकाराम महाराज महा प्रसादालय’ मंडप उभारण्यात आला आहे. सकाळच्या न्याहरीपासून ते रात्री १० वाजेपर्यत या मंडपात अखंडपणे अन्नदान सुरु आहे.

महेंद्र होनावळे व सहकारी यांजकडून महाप्रसाद तयार करण्यात येत असून, मावळ, खेड, मुळशी या तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ आपापल्या गावाच्या भाकरी डोंगरावर आणून देत आहेत. मराठवाडा विकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्यावतीने भाविकांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी मोफत टँकर देण्यात आला आहे.

चाकण, शेल पिंपळगाव, मोशी, तळेगाव येथील भाजीपाला विक्रेत्यांकडून मोफत भाजीपाला व भंडारा डोंगर पंचक्रोशीतील दुध व्यवसायीकांकडून मोफत दूध उपलब्ध होत आहे. मावळ तालुक्यातील बोरीवली व खांडी गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळी परंपरेप्रमाणे महाप्रसाद वाटपाची सेवा करीत असून, आळंदी येथील स्वकाम सेवा संघ हा परिसर स्वच्छ ठेवत आपली सेवा पुरवीत आहे. चिखली येथील प्रदीप नेवाळे यांच्यावतीने अल्पदरात यंदाही मंडप व्यवस्था करण्यात आली आहे.

मंदिराच्या अलीकडे ५०० मी. अंतरावर भाविकांच्या दुचाकी व चार चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था ट्रस्टच्यावतीने करण्यात आली असून, तळेगाव एम.आय.डी.सी. नवलाख उंबरे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक श्री. तुंग व त्यांचे सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. डोंगरावर येणाऱ्या भाविकांनी पार्किंगबाबत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button