आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवड मधील खेळाडूंची दमदार कामगिरी
– आमदार महेश लांडगे यांनी केले गुणवंत खेळाडुंचे अभिनंदन
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – के. डी. जाधव इनडोअर हॉल, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ‘वाको इंडिया’ आयोजित तिसऱ्या ओपन इंटरनॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या १४ खेळाडूंपैकी १० खेळाडूंनी दमदार कामगिरी करत १० पदकांची कमाई केली. यामध्ये ५ सुवर्णपदक, ४ रौप्यपदक व १ कांस्यपदक मिळवत भारतीय संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केली.
प्रामुख्याने ५१ किलो वजनी गटामध्ये दर्शन तांबोळकर या खेळाडूने ‘फुल कॉन्टॅक्ट गाला फाईट’ या इव्हेंटमध्ये ‘टायटल बेल्ट’ जिंकून सुवर्णपदकासह ५०० युरोचे बक्षीस मिळविले आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सर्व यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
सुवर्णपदक विजेते खेळाडू प्रणव सकुंडे, सिद कामी, अर्णव देशपांडे, उत्कर्ष चव्हाण असे आहेत. तर रौप्यपदकावर आस्मी लोंढे, विद्या आदमाने, जिगर राव, ध्रुव सावळे यांनी मोहर उमटवली आहे. तसेच, निलेश भुशेट्टी याने कांस्यपदकाची कमाई केली आहे. अर्णव लोंढे, परशुराम नवलेकर, पार्थ डोंगरे, देवश्री झोपे यांनीही स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये एकूण२४ देशांनी सहभाग नोंदवला. प्रामुख्याने इराण, तुर्की, कजाकिस्तान, नेपाळ, सिंगापूर, ब्रिटन व भारत यासारख्या अनेक देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. वाको इंडिया किक बॉक्सिंगचे अध्यक्ष संतोष अग्रवाल व महाराष्ट्र वाको इंडियाचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे कौतुक केले.
पिंपरी-चिंचवडचे नाव परदेशात उज्ज्वल करा…
या स्पर्धेमध्ये भोसरी येथील नियुद्ध कराटे किक बॉक्सिंग असो. व महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे खेळाडू सहभागी होते. या स्पर्धेमध्ये नियुद्ध कराटे किक बॉक्सिंग असो. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रकाश बोईनवाड यांनी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम पाहिले. गणेश लांडगे, सचिन जरे, प्रवीण नाईकडे व कौस्तुभ आदक यांनी महाराष्ट्र कोचची भूमिका पार पाडली. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे व महाराष्ट्र किक बॉक्सिंग असो. चे चेअरमन संतोष बारणे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत असेच पिंपरी-चिंचवडचे नाव देशात व परदेशात उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.