“मेरा युवा भारत” उपक्रमांतर्गत भारती विद्यापीठाचा स्मार्ट सिटी प्रकल्पांचा अभ्यास दौरा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – युवकांमधील गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने मेरा युवा भारत उपक्रम राबविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये “मेरा युवा भारत” या उपक्रमाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्या वतीने दि.१३ रोजी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी निगडी येथील पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.च्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी)आणि ऑटो क्लस्टर येथील पीसीएमसी स्टार्ट-अप इनक्युबेशन सेंटर येथे भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रो. प्रियांका पायगुडे, प्रो. स्नेहल चौधरी, प्रो.प्रकाश देवळे, गौरव शर्मा, श्रीकृष्ण हिंगमिरे, अक्षय उखळकर, इनक्युबेशन सेंटर व्यवस्थापक उदय देव, पीसीएमसी स्मार्ट सारथीचे बिनिश सुरेंद्रन, आशिष चिकणे, जस्टीन मॅथ्थू यांच्या विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
आयसीसीच्या भेटीदरम्यान गौरव शर्मा, श्रीकृष्ण हिंगमिरे, अक्षय उखळकर यांनी एकात्मिक निरीक्षण प्रणाली, घनकचरा व्यवस्थापन डेटा प्रणाली, सिटी इन्फॉर्मेटिव्ह सिस्टीम (मेसेजिंग सिस्टीम) बद्दल माहिती देवून प्रात्यक्षिक सादर केले. ऑटो क्लस्टर येथे पीसीएमसी स्टार्ट-अप इनक्युबेशन सेंटरचे व्यवस्थापक उदय देव यांनी स्टार्ट-अपला सहाय्य करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या इको सिस्टीमची माहिती दिली. या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ५२ स्टार्ट अप्सना मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मेरा युवा भारत उपक्रमामध्ये सहभागी झाल्यास युवकांना रोजगार, व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या भेटीदरम्यान पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांना मेरा युवा भारत उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मेरा युवा भारत संकेतस्थळाची माहिती देण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत अॅप असलेल्या पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपविषयी माहिती देण्यात आली. तसेच पीसीएमसी स्मार्ट सारथीचे (पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत अॅप्लिकेशन) ऑनलाइन सेवा-सुविधा, तक्रार निवारण योजना, योजना आणि सुविधांची माहिती, हेल्पलाइन इत्यादी विविध फायदे देखील सांगण्यात आले. या भेटीमध्ये एकूण ४८ विद्यार्थी आणि ३ शिक्षक यांनी सहभाग नोंदविला.