श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर मोठ्या उत्साहात अखंड गाथा पारायण सोहळ्याला सुरुवात
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंतपंचमीनिमित्त गेली ७१ वर्षांपासून सुरु असणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली.
मावळचे माजी आमदार स्व. दिगंबरदादा भेगडे याचे चिरंजीव मनोहर भेगडे व परिवाराच्यावतीने बुधवारी पहाटे ५ वाजता परंपरेप्रमाणे पांडुरंगाला अभिषेक व महापूजा संपन्न झाली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख व गाथामूर्ती ह.भ.प. नाना महाराज तावरे, उद्योजक विजय जगताप, संत साहित्याचे अभ्यासक कीर्तनकार ह.भ.प. पंकज महाराज गावडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, कासारवाडी येथील दत्त आश्रमाचे मठाधिपती शिवानंद स्वामी महाराज, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, पिं.चिं.चे माजी नगरसेवक आप्पा बागल, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद, ह.भ.प. जगन्नाथ नाटक पाटील, जोपाशेठ पवार, ह.भ.प. ढमाले मामा व सर्व विश्वस्त, भंडारा डोंगर परिसरातील इंदोरी, सुदवडी, जांबवडे, सुदम्ब्रे आदी गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गाथा पारायण सोहळ्यासाठी मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागातून, तसेच मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून आलेल्या भाविकांचे स्वागत श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद यांनी केले.
प्रास्ताविक करताना बाळासाहेब काशीद म्हणाले, की भंडारा डोंगरावरील भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी, तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे, समाजजीवनात कार्यरत असणारे सर्वजण मदत करीत असून, मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. आजपर्यंत मंदिराचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. सर्वांच्या सहकार्याने संत तुकाराम महाराजच हे पवित्र मंदिर निर्माणाचे कार्य पूर्णत्वास नेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार विलास लांडे व ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांनी या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. तसेच ह.भ.प. नाना महाराज तावरे यांनी आशीर्वाद दिले.