विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रशासकीय रचना समजून घेणे आवश्यक : तुकाराम जाधव
इंद्रायणी महाविद्यालयात युनिक अकॅडमीच्या सहकार्याने युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -विद्यार्थ्यांनी समाजाची प्रशासकीय रचना समजून घेत त्याचे आकलन करणे गरजेचे आहे. यातून त्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित होऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होईल, असे प्रतिपादन युनिक अकॅडमीचे संस्थापक संचालक तुकाराम जाधव यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रायणी महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन तुकाराम जाधव यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्राचार्य डॉ. रुपेश पाटील, युनिक अकॅडमीचे केतन पाटील आदी उपस्थित होते.
तुकाराम जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना परीक्षेचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा या जगातील अवघड परीक्षांपैकी एक असल्याने त्याचे स्वरूप समजून घेत विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन साधल्यास यश हमखास मिळते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. शिस्त आणि गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी सनदी सेवांच्या परीक्षांना सामोरे जाऊन यश संपदान करावे आणि समाजाची सेवा करावी, असे मत प्राचार्य डॉ. मलघे यांनी व्यक्त केले. स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले.
अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत शेटे यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये प्रेरणा आणि प्रोत्साहन खूप गरजेचे असते. युनिक अकॅडमी आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या या संयुक्त स्पर्धा परीक्षा केंद्रातून अनेक विद्यार्थी यशस्वी होतील आणि पुढील अनेक पिढ्यांना ते मार्गदर्शन करतील. शिस्तिला महत्त्व देत विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे व आपली गुणवत्ता सिद्ध करावी.
संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले, की या स्पर्धा परीक्षा केंद्रात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवावे. या संधीचा फायदा घ्यावा. चांगला अभ्यास करून मावळचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे.
सूत्रसंचालन प्रा. अजित जगताप व प्रा. विणा भेगडे यांनी, तर आभार उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांनी मानले.