ताज्या घडामोडीपिंपरी

शाहू सार्वजनिक वाचनालयामध्ये मराठी भाषा संवर्धन सप्ताह

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर, चिंचवड येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयामध्ये मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक भाऊसाहेब पठारे हे होते. सामाजिक कार्यकर्ते कैलास दुर्गे, वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, सचिव राजाराम वंजारी, जेष्ठ संचालक राजगोंडा पाटील, राजेंद्र पगारे, भरत गायकवाड, मनीषा पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांचे *”मराठी भाषा : काल-आज-उद्या”* या विषयावर व्याख्यान झाले. पाहुण्यांचे स्वागत मनीषा पाटील यांनी केले तर प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी केले.

राजेंद्र घावटे म्हणाले की, “भाषा एक संवादिनी आहे. एका भाषेचा दुसऱ्या भाषेबरोबर समन्वय पूर्वापर चालत आलेला आहे.

पूर्वी संस्कृत भाषा, नंतर फारसी अरेबिक आदी भाषा व्यवहारामध्ये प्रभावशाली होत्या. मधल्या काळामध्ये इंग्रजी ही भाषा व्यवहाराची झाली. आज मोठया शहरांमध्ये हिंदी आणि इंग्रजी प्रामुख्याने व्यवहारात वापरल्या जातात. परंतु महाराष्ट्रा मध्ये मराठी भाषेचाच वापर प्राधान्याने केला जाणे गरजेचे आहे. तिला दुय्यम स्थान असता कामा नये. त्यासाठी मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. मराठीला ज्ञानभाषा आणि व्यवहाराची भाषा बनवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. वैभवशाली अशा मराठी संस्कृती परंपरा यांचा जागर झाला पाहिजे. सकलसंतांनी आपले सर्व साहित्य हे प्रमाण व बोली भाषेमध्ये लिहिले. शिवरायांनी राज्यव्यवहार कोष निर्माण करून व्यवहारात मराठीचे महत्व वाढवले. समाज सुधारक आणि साहित्यिकांनी मराठी संवर्धनाचे काम केले. लोककलावंतांनी आपल्या लोककलेतून मराठी भाषा आजवर जपलेली आहे. शासन दरबारी अनेक प्रयत्न होताना दिसतात. परंतु ते संवर्धनासाठी पुरेसे नाहीत. मराठी भाषा व तिच्या बोली भाषा देशातील बारा कोटी लोक बोलतात. आज जगामध्ये लोकसंख्येनुसार बोलली जाणारी पंधरावी भाषा व भारतातील चौथी भाषा ही आपली मराठी भाषा आहे. प्रमाण भाषेबरोबरच बोली भाषेतील साहित्य आणि मौखिक परंपरा हे आपलं संचित आहे आणि हे संचित आपण जपलं पाहिजे. लोकशिक्षण, लोकसंग्रह , लोकसंपर्क यातूनच संवर्धन होऊ शकते . मराठीला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाला तर मराठीची वैभवशाली परंपरा आपण सदैव कायम ठेवू शकतो. ही परंपरा राखण्यासाठी वाचनालये, सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था, शैक्षणिक संस्था यांचा सहभाग वाढवत मराठीचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे . आपण व्यवहारांमध्ये मराठीचा वापर स्वतःपासून सुरू करून मराठी मधूनच संवाद साधला पाहिजे. तरच इतर प्रांतातील लोक सुद्धा व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरू शकतील.”

मराठी वृत्तपत्र वाचन कट्ट्याचे उदघाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आहे.
संयोजन ग्रंथपाल अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रविंद्र अडसूळ यांनी केले.

सूत्रसंचालन राजाराम वंजारी यांनी केले.
आभारप्रदर्शन राजेंद्र पगारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button