पिंपरीताज्या घडामोडी

“राष्ट्र उभारणीसाठी ज्येष्ठांचे योगदान मोलाचे!” – सुरेश साखवळकर

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “राष्ट्र उभारणीसाठी ज्येष्ठांचे योगदान मोलाचे ठरते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक सुरेश साखवळकर यांनी एस. के. एफ. सभागृह, टाटा मोटर्स कंपनीसमोर, चिंचवड येथे व्यक्त  केले.

ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेच्या ३२व्या वर्धापनदिनानिमित्त सुरेश साखवळकर यांच्या हस्ते ‘जिव्हाळा’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश पेठे, श्रद्धा पेठे, ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, ‘जिव्हाळा’चे संपादक नंदकुमार मुरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

सुरेश साखवळकर पुढे म्हणाले की, “ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक पातळीवर नोंदविला आहे. वाढत्या वयामुळे शरीर साथ देत नाही अन् मनाला एकाकीपण जाणवते; परंतु मनात आणले तर शारीरिक व्याधींवर मात करून ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून सकारात्मक कार्यातून समाजाला आनंद देऊ शकतात. मुखपृष्ठापासूनच अंतर्बाह्य उत्कृष्ट निर्मितीमूल्ये असलेला ‘जिव्हाळा’ हा त्याचा उत्तम वस्तुपाठ आहे!” ओमप्रकाश पेठे यांनी आपल्या मनोगतातून, “प्रभू रामचंद्र हे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. आपण जे समाजाला देतो, तेच परतून आपल्याकडे येते, हा निसर्गनियम आहे. त्यामुळे नेहमी आनंद वाटत राहा. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड ही एक अतिशय सुनियोजित संस्था आहे!” असे गौरवोद्गार काढले.

मंगला दळवी आणि रत्नप्रभा खोत यांनी केलेल्या त्रिवार ओंकाराने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, “बत्तीस वर्षांच्या कालावधीत एखाद्या विस्तीर्ण वटवृक्षाप्रमाणे बहरलेला आमचा ज्येष्ठ नागरिक संघ हा पिंपरी – चिंचवड परिसरातील सर्वात मोठा अन् उपक्रमशील संघ आहे!” अशी माहिती दिली. त्यानंतर सुधाकर कुलकर्णी आणि शामकांत खटावकर यांनी केलेल्या मंगलदायी शंखनादाच्या सुरात एक मोठा शिंपला उघडून ‘जिव्हाळा’ या अंकाच्या प्रती बाहेर काढून अतिशय कल्पकतेने मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी नंदकुमार मुरडे यांनी, “यावर्षी ‘माझे आईबाबा’ हा विषय देऊन सभासदांकडून साहित्य मागविले होते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला!” अशी माहिती दिली.

ज्या सभासदांच्या विवाहाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सभासदांना भगवद्गीता, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ प्रदान करून सपत्नीक सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये गोपाळ भसे, सुदाम गुरव, श्रीराम पर्बत, अश्विनीकुमार लेले, हरिश्चंद्र चव्हाण, देवेंद्र कासलीवाल, रघुनाथ रांजणीकर यांचा समावेश होता. त्यांनतर वर्धापनदिनानिमित्त शुक्रवार आणि शनिवार रोजी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या सभासदांना तसेच ‘जिव्हाळा’ अंकाच्या निर्मितीसाठी साहाय्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेच्या सभासद आणि कार्यकारिणीने संयोजनात परिश्रम घेतले. राजाराम गावडे यांनी सूत्रसंचालन केले. गोपाळ भसे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर संघाच्या वतीने सभासदांना स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button