तरुणांनी देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मतदानाबाबत जागरूक असणे गरजेचे – आयुक्त शेखर सिंह
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) / ‘राष्ट्रीय मतदार दिन’ हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहण्यासाठी १८ वर्ष पुर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकशाहीत मतदानाला सर्वात जास्त महत्व असून नागरिकांची त्यामध्ये सर्वात मोठी भूमिका असते. देशात तरूणांची संख्या जास्त आहे आणि या तरुणांनी देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मतदानाबाबत जागरूक असणे गरजेचे आहे, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
२५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हास्तरावर व मतदान केंद्र स्तरावर साजरा केला गेला. १४ वा राष्ट्रीय मतदार दिवसासाठी ‘’मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’’ हा विषय निवडणूक आयोगाकडून देणेत आलेला आहे. त्याअनुषंगाने २०५, चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते नवोदीत मतदारांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.
या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, नोडल अधिकारी राजीव घुले, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच नव मतदारांमध्ये अभिनेत्री आर्या घारे, दुर्गा ब्रिगेडच्या दुर्गा भोर, पी. आय. सी. टीच्या ऋतिका मातेरे, एन.ई.टीच्या सृष्टी पाटील तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीनी गरवारे कॉलेजच्या सृष्टी शेळके, एम.आय.टी.काॅलेजच्या भक्ती शिंदे आदी उपस्थित होत्या.
सदरचा कार्यक्रम २०५, चिंचवड विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.