“जल्लोष शिक्षणाचा” उपक्रम राज्यातील शाळांसाठी दिशादर्शक – शिक्षण आयुक्त सुरज मांढरे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने चौकटीच्या बाहेर विचार करून जल्लोष शिक्षणाचा हा उपक्रम अतिशय भव्य दिव्य प्रमाणात राबविला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीला लागून यातूनच राष्ट्र निर्मिती करणारे तरुण निर्माण होतील. तसेच जल्लोष शिक्षणाचा हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांसाठी दिशादर्शक असल्याची भावनाही महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या वतीने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष शिक्षणाचा २०२४ या दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप समारंभ बुधवारी पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास आमदार उमा खापरे, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, त्यांच्या पत्नी ईशा सिंह, माजी उपमहापौर केशव घोळवे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, उप आयुक्त अजय चारठाणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, श्रीनिवास दांगट, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी शितल वाकडे, किरण मोरे, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, चितळे बंधूचे व्यवस्थापकीय संचालक इंद्रनील चितळे, सॅडविक एशिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक किरण आचार्य, आकांशा फाऊंडेशनच्या जयश्री ओबेरॉय, रेगे चित्रपट फेम अभिनेते आरोह वेलनकर तसेच विविध विभागांचे प्रमुख, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण आयुक्त सुरज मांढरे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण आणि शैक्षणिक बदलांमुळे शिक्षण विभागासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. अशावेळी उत्तम प्रशासक असतील तर शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले बदल घडवता येऊ शकतात हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दाखवून दिले आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण महत्वाची भूमिका बजावणार आहे असे सांगून या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच राष्ट्र निर्मिती करणारे तरुण निर्माण होतील असा विश्वासही शिक्षण आयुक्त मांढरे यांनी व्यक्त केला.
आमदार उमा खापरे म्हणाल्या, जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून मला माझे शालेय जीवन आठवले. महापालिका शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक कर्मचारी वर्ग विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये मेहनत घेत आहेत, त्यामुळे नागरिकांचा महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने राबविलेल्या जल्लोष शिक्षणाचा या उत्सवामध्ये महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी नवनवीन वैज्ञानिक प्रयोग, आराखडे, चित्रकला, हस्तकला अतिशय सर्जनशीलतेने मांडले आहेत. या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगली संधी मिळाली तर यातूनच समाजाला घडविणारी भावी पिढी तयार होईल आणि हेच जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमाचे यश आहे, असे मत व्यक्त करताना महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा १३ फेब्रुवारी रोजी दुर्गा टेकडी येथे आयोजित केली जाईल, अशी घोषणाही आमदार खापरे यांनी यावेळी केली.
महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन यांच्यातील समन्वयामुळेच हा उत्सव यशस्वीपणे पार पडला. महापालिकेच्या शाळांचे सर्वेक्षण करून नुकतेच ३८ शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आणखी ६४ शाळांचे सर्वेक्षण करून तेथे योग्य त्या सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांमध्ये समन्वय साधून महापालिका शाळांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी शाळांना सीएसआरच्या माध्यमातून आर्थिक मदत देऊन शाळांना स्वावलंबी करण्यावरही भर देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी, पालकांची रांग आपल्याला येत्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळेल.
माजी उपमहापौर केशव घोळवे म्हणाले, जल्लोष शिक्षणासारखे भव्य कार्यक्रम मोठमोठ्या खासगी शाळांमध्येच होत होते, परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेने अशा प्रकारचे उपक्रम महापालिका शाळांमध्ये राबवून त्याद्वारे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील शाळांचा दर्जा हा खासगी शाळांप्रमाणे वाढत आहे, तसेच उद्योग नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडला शिक्षण नगरी करण्यासाठी हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.
चितळे बंधुचे व्यवस्थापकीय संचालक इंद्रनील चितळे म्हणाले, महापालिकेने वेगळा विचार करून अतिशय व्यापक स्वरूपामध्ये जल्लोष शिक्षणाचा हा उपक्रम राबविला आहे. यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना लहान वयातच मोठी संधी उपलब्ध होईल तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळू शकेल आणि त्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध होऊ शकते.
अभिनेते आरोह वेलणकर म्हणाले, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या उपक्रमामुळे त्यांच्यातील गुणांचा पाया मजबूत होत असून त्यांच्यातील संस्कारांचे पालन पोषणही होत आहे. एक चांगला विद्यार्थीच नव्हे तर एक चांगला माणूस घडविण्यासाठीही अशा प्रकारच्या उपक्रमाची निश्चितच आवश्यकता आहे.
या समारोप समारंभात महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शिघ्र निदान आणि शिघ्र उपचार उपक्रमाच्या पुस्तिकेचे तसेच संगणक विज्ञान मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच यावेळी जल्लोष शिक्षणाचा २०२४ उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शाळांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा सन्मान स्विकारला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त शेखर सिंह यांनी तर सुत्रसंचालन मयुरी मालनकर, नितेश कामदार यांनी केले आणि आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आभार मानले.
‘जल्लोष शिक्षणाचा’ उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शाळा
• बालवाडी शाळा –
प्राथमिक शाळा, पिंपळे सौदागर (शिक्षिका- मंदा चव्हाण)
प्राथमिक शाळा चिखली, मुले क्र. ९० (शिक्षिका- अलका हरगुडे)
वसंतदादा पाटील प्राथमिक शाळा, आकुर्डी (शिक्षिका- रुपाली दशरथ भालेराव)
• प्राथमिक विभाग –
सावित्रीबाई फुले प्राथमिक कन्या शाळा क्र. १०७, मोशी
साई जीवन प्राथमिक शाळा क्र. ८७, जाधववाडी
महापालिका कन्या व मुले शाळा क्र. ५२, पिंपळे निलख
• माध्यमिक विभाग –
आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर
माध्यमिक विद्यालय फुगेवाडी, भागशाळा १, बोपखेल
माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव
शाळा सिद्धी या शासनाच्या वैशिष्ट्यपुर्ण उपक्रमातील विजेत्या शाळा
अध्ययन मूल्यांकन – सावित्रीबाई फुले प्राथमिक मुले शाळा क्र.१०६ मोशी
विद्यार्थ्यांची प्रगती, संपादणूक आणि विकास – पिं. चिं. मनपा प्राथमिक शाळा क्र ९२, म्हेत्रेवाडी
शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन – महापालिका प्राथमिक कन्या व मुले शाळा क्र ५२ पिंपळे निलख, हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर दापोडी मुले शाळा ३७, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा, चिखली
शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन – कै. लिलाबाई खिंवसरा प्राथमिक मुले शाळा मोहननगर
समावेशन, आरोग्य आणि संरक्षण – नागू बारणे प्राथमिक मुले शाळा क्र.६०/२ वाकड
पालकांचा आणि समाजाचा सहभाग – पिं. चिं. मनपा प्राथमिक शाळा डूडूळगांव