ताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक

मंगलसुरांच्या दीपबंधाने रसिकांचे अभ्यंगस्नान भावनांच्या शब्दसुरावटीने दिवाळी पहाट उजळली

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगीतिक सोहळ्यात गायक-वादकांचे सूर सजले; रसिकांनी दिली भरभरून दाद

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  प्रकाशाच्या झळाळीने, आनंदाच्या लहरींनी आणि सुरांच्या सुवासिक झुळुकींनी सजलेली दिवाळीची पहाट… कानात झंकारणारे स्वर, भावनांच्या लहरींनी ओथंबलेले वातावरण… आणि शेकडो संगीतप्रेमींची मिळणारी दाद… अशा संगीतमय वातावरणात मंगलसुरांच्या अभ्यंगस्नानाने रसिकांची दिवाळीची पहाट अविस्मरणीय झाली. आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात  सुरांच्या दीपांनी व भावनांच्या शब्दसुरावटीने आजची पहाट उजळली.

भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतार्थ, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी यांच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट २०२५ – दीपबंध सुरांचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी उमा दरवेश, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, नाट्यगृह व्यवस्थापक राकेश सौदे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक बबिता गावंडे, समन्वयक  समीर सूर्यवंशी, संगीत शिक्षक नंदीन सरिन, वैजयंती भालेराव, स्मिता देशमुख, संतोष साळवे, उमेश पुरोहित ग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वार, प्रतिभा मुनावत, माजी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.सतिष गोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या सुरेल सोहळ्यात संगीताच्या रेशमी तारा, सुरांच्या लहरी आणि भावनांच्या झंकाराने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

“सुर निरागस हो…” या भावगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.ज्यामध्ये गायक-वादकांनी रसिकांच्या मनांवर आपल्या शब्दसुरांनी लहर सोडली. त्यानंतर बंदिशी वादनांनी कार्यक्रमाला गोडवा आणला, तर अभंग आणि भक्तिगीतांनी उपस्थितांची मनं भक्तिरसाने ओथंबली, आणि संगीताच्या लाटांवर रसिकांची मनं तरंगू लागली. गायक कोमल कृष्णा, राजेश्वरी पवार, विनल देशमुख, गणेश मोरे यांनी ‘शोधी सी मानवा’, ‘सूर तेच छेडीता’, ‘अधीर मन झाले’, ‘बहरला हा मधुमास नवा’, ‘पिया तो से नयना लागे रे’, ‘ये हसी वादिया’, ‘मेरे ढोलना सुन’…अशी विविध मराठी आणि हिंदी गीतं सादर करून रसिकांची मने जिंकली. ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगातून भक्तिरसाची पेरणी केली. ‘माऊली माऊली रूप तुझे’ या गाण्याच्या सुरांनी संगीतमय तोरण चढवले, आणि रसिकांचे मन मंत्रमुग्ध झाले.

वादक कलाकारांनीही आपली प्रतिभा खुलवली. नितीन खंडागळे, सुबोध जैन, दीपक काळे, शाम चंदनशिवे आणि सागर घोडके यांच्या वादनकौशल्याने कार्यक्रमाला अप्रतिम रंग चढवला.

 कार्यक्रमाचे निवेदन रत्ना दहीवेलकर यांनी आपल्या ओघवत्या,कवितामय शैलीत केले.

मिस अर्थ इंडिया कोमल चौधरी यांचा सन्मान

हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस डिवाइन ब्युटी २०२५’ या स्पर्धेत ‘मिस अर्थ इंडिया २०२५’ हा पुरस्कार कोमल चौधरी यांना मिळाला आहे. त्या आता जागतिक स्तरावर होणाऱ्या ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कोमल चौधरी यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button