महावितरणचा ऐण दिवाळीत शिमगा?..
ग्राहक सेवा व कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ‘रीस्ट्रक्चरिंग’ प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करा शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांचे महावितरणच्या संचालकांना निवेदन

दिवाळीपूर्वी नव्या कार्यालयीन पद्धतीची अंमलबजावणी नको
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यभरातील महावितरण कार्यालयांच्या पारंपरिक ‘सेक्शन’ या कार्यालयीन पद्धतीला बंद करून नव्या ‘रीस्ट्रक्चरिंग’ रचना पद्धतीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय कंपनी प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या नव्या पद्धतीची अंमलबजावणी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात करणे हे ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अव्यवहार्य ठरेल, असे स्पष्ट करून ही अंमलबजावणी १ नोव्हेंबर २०२५ नंतरच करावी, अशी मागणी करणारे निवेदन पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य तथा चिंचवड विधानसभा शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी मुंबईस्थित महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) सचिन तालेवार आणि संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना सादर केले आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, ‘महावितरण कंपनीने राज्यभरात गेल्या ६५ वर्षांहून अधिक काळ चालत असलेली “सेक्शन” ही कार्यालयीन पद्धत बंद करून नवीन रचना पद्धतीचा निर्णय घेतला आहे. या नव्या पद्धतीचा हेतू प्रशासनात कार्यक्षमता व आधुनिकता आणणे हा असला तरी, या प्रक्रियेबद्दल ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये अद्याप आवश्यक जनजागृती झालेली नाही. त्यातच दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर अचानक अशी रचना बदलल्यास कामकाजात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
निवेदनात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, सणासुदीच्या काळात विजेसारख्या अत्यावश्यक सेवेत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. नव्या पद्धतीनुसार एका अधिकाऱ्यावर चार सेक्शनचा भार येणार असून, एका व्यक्तीला इतकी मोठी जबाबदारी पार पाडणे अवघड ठरेल. परिणामी कामकाजाची गती मंदावेल आणि ग्राहकांना सेवा मिळण्यात विलंब होण्याची शक्यता आहे.
तसेच, नव्या रचनेनुसार बिले वाटप, वसुली, मीटर-कनेक्शन व देखभाल ही चार स्वतंत्र कामे स्वतंत्र जबाबदाऱ्यांमध्ये विभागली गेली आहेत. ही विभागणी प्रशासनासाठी सोयीची ठरू शकते, परंतु प्रत्यक्षात ग्राहकांच्या तक्रारी आणि मागण्या जलदगतीने सोडविणे अवघड जाईल. सध्याच्या पद्धतीत प्रत्येक सेक्शनमध्ये अभियंते आणि कर्मचारी स्थानिक ग्राहकांशी सतत संपर्कात असतात, त्यामुळे तात्काळ सेवा शक्य होते.
निवेदनात आणखी म्हटले आहे की, “पूर्वी प्रत्येक सबडिव्हिजनमध्ये चार अभियंते काम पाहत असत आणि त्यांच्याकडे स्वतंत्र शाखांची जबाबदारी असे. मात्र, नव्या पद्धतीत एका अधिकाऱ्यावरच सर्व शाखांचा भार टाकण्यात आला आहे, ज्यामुळे कामाचा ताण आणि जबाबदारी वाढणार आहे. हे केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर ग्राहकांनाही फटका देणारे ठरेल. त्यामुळेच ग्राहकांच्या हितासाठी तसेच कार्यक्षम आणि सुरळीत प्रशासनासाठी नव्या कार्यालयीन कामकाज पद्धतीची अंमलबजावणी १ नोव्हेंबर २०२५ नंतर करण्यात यावी. तोपर्यंत जुन्या ‘सेक्शन’ पद्धतीनुसार कामकाज सुरू ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांना तातडीच्या सूचना देण्यात याव्यात,” असे या निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान संचालक (संचालन) सचिन तालेवार आणि संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी या निवेदनाची त्वरीत दखल घेतली आहे. महावितरणच्या ग्राहकांना कोणतीही समस्या भेडसावू नये यासाठी सज्ज राहण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
“सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांच्या सेवा खंडित होणे, बिलिंगमध्ये गोंधळ होणे, किंवा वीजपुरवठ्यात विलंब होणे हे टाळण्यासाठी या नव्या प्रणालीची अंमलबजावणी दिवाळीनंतर करणे अत्यावश्यक आहे अन्यथा ऐन दिवाळीत शिमगा साजरा करण्यासारखी स्थिती उदभवू शकते”… – संतोष सौंदणकर, सदस्य – पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती…













