श्रीराम आनंदोत्सव अनुभवण्याची संधी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली – गीत रामायण सोहळ्यात आ. दरेकरांचे प्रतिपादन
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- प्रभू श्रीराम अयोध्येला आल्यावर कशा प्रकारे आनंदोत्सव साजरा होत होता ते आपण रामायणात, चित्रपटांत, कथांमध्ये पाहायचो. तोच आनंदोत्सव अनुभवण्याची संधी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारीला दिली, असे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम आंनद सोहळा गीत रामायण या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी भाजपा महामंत्री संजय उपाध्याय, गायक निनाद आजगावकर, मुंबई भाजपा सचिव जितेन्द्र राऊत, दक्षिण मध्य जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश शिरवडकर, माहीम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा अक्षता तेंडुलकर, यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, श्रीराम आंनद सोहळा हे अत्यंत समर्पक असे या कार्यक्रमाचे नाव आहे. काल याची अनुभूती देशातील करोडो लोकांनी घेतली. जे आपण रामायणात, चित्रपटांत पाहायचो की राम अयोध्येला आल्यावर कशा प्रकारे आनंदोत्सव होत होता. तोच आनंदोत्सव अनुभवण्याची संधी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारीला दिली. संपूर्ण देश या आनंदोत्सवात पक्षापलीकडे जाऊन सहभागी झाला. महाविद्यालयाचे तरुण-तरुणी जय श्रीरामचे नारे देत होते. हे नव्या पिढीत रुजविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचेही दरेकर म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांना टोला लगावत दरेकर म्हणाले की, नाशिकमध्ये एका नेत्याने म्हटले सर्वसामान्य लोकं क्रांती घडवितात. मला त्यांना सांगायचे आहे सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करणारा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. त्यामुळे देशातील लोकांनी त्यांना दोनवेळा पंतप्रधान पदी बसवून क्रांती केली. आता तिसऱ्यांदासुद्धा ही सर्वसामान्य माणसं क्रांती करून या देशाच्या पंतप्रधानांना पुन्हा विराजमान करणार आहेत.
कालचा दिवस हा आपल्या आयुष्यात दिवाळी सारखा होता. पंतप्रधान मोदींचे भाषणही एक अभूतपूर्व होते. राम म्हणजे विवाद नाही तर राम म्हणजे समाधान आहे हा मंत्र त्यांनी दिला. काल देशातील लोकांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि देशभर आनंदोत्सव साजरा केला. पण विरोधकांनी राम भाजपने हायजॅक केलाय अशी प्रतिक्रिया दिली. कधीकधी कुणाला आनंदही पाहवत नाही. वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलली जाते. मात्र जनता सुज्ञ आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या अनुष्ठानाची थट्टा करणारे दुर्दैवी नेतेही याच राज्यात आहेत. ज्या हिंदुत्वाचा जयघोष ज्यांनी केला त्यांचा वारसा सांगणारी लोकं हे बोलताहेत हे दुर्दैव या राज्याने कधीच पाहिले नाही. तुम्ही अडीच वर्ष काहीच केले नाही. मोदींनी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेही पुन्हा सहा हजार दिले. १२ हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जाताहेत. शेतकऱ्यांविषयी फुकट पुतणा मावशीचे प्रेम, आम्ही समर्थ आहोत, असा टोलाही दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
गीत रामायणात फार मोठे सामर्थ्य
प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्येत निर्माण झाले आहे. यानिमित्ताने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. २२ जानेवारी हा इतिहास लिहिणारा दिवस आहे. कालचा आनंद सोहळा एका दिवसापूरता नाही तर पिढ्यानंपिढ्या ठेवायचा आहे. त्यामुळे असे श्रीराम आनंद सोहळे सर्व ठिकाणी साजरे झाले पाहिजेत. गीत रामायणात फार मोठे सामर्थ्य आहे. मोदींच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याचेही दरेकर म्हणाले.