पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अभिजात मराठी भाषा सप्ताहात रसिकांनी अनुभवला लोककला, लोकसंगीत आणि मराठी संस्कृतीचा भावस्पर्शी संगम
‘फोक प्रबोधन’च्या माध्यमातून लोकसंस्कृतीचा झंकार नवपिढीपर्यंत पोहोचवत मराठी भाषेला अभिवादन!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषेचे माधुर्य, लोकसंगीताची लय आणि मातीच्या गंधात रुजलेली लोकपरंपरा… या तिन्हींचा सुरेल संगम पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने सादर झालेल्या ‘फोक प्रबोधन’ कार्यक्रमातून रसिकांनी अनुभवला. लोककलांच्या सजीव स्वरांनी, नृत्यांच्या तालांनी आणि मराठी अस्मितेच्या ओलाव्याने भरलेला हा सोहळा केवळ कलात्मक मेजवानी नव्हे, तर मराठी संस्कृतीच्या शतकांपूर्वीच्या लोकसंस्कृतीच्या ठेवा नवपिढीपर्यंत पोहोचवणारा ठरला. मराठी संस्कृतीतील शब्द, संगीत आणि नृत्य यांचा सुरेख संगम अनुभवताना रसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत असलेल्या या महोत्सवात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘फोक प्रबोधन’ हा कार्यक्रम सादर झाला. याप्रसंगी महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मनोज डाळिंबकर यांच्यासह महापालिकेचे ग्रंथपाल प्रतिभा मुनावत, वर्षा जाधव, राजु मोहन, वैशाली थोरात, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गट निदेशक शर्मिला काराबळे, रविंद्र ओव्हाळ, बबिता गावंडे, संगीत शिक्षक संतोष साळवे, उमेश पुरोहित आदी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसंगीत, नृत्य, भारूड, अभंग आणि पारंपारिक वाद्य यांचा रंगतदार संगम सादर करणाऱ्या ‘फोक प्रबोधन’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘पिंगळा महाद्वारी’ आणि ‘आला वासुदेव तुमच्या दारी’ या मराठी संस्कृतीच्या सांस्कृतिक वाहकांच्या प्रतिकांच्या कलात्मक सादरीकरणातून झाली. सूत्रसंचालक शेखर नवतरे आणि दाऊद इनामदार यांच्या ओघवत्या निवेदनातून मराठी भाषेचा अभिजात दर्जा, तिचा संस्कारांचा ठेवा आणि मातीचा सुगंध अधोरेखित करण्यात आला. पारंपारिक वाद्य आणि मराठी कलेचा इतिहास यावेळी त्यांनी उलगडला. मराठी संस्कृतीतील वाद्य, गाणी ही केवळ मनोरंजनाची माध्यमे नसून त्यामध्ये भावनांचा आणि वेदनांचा अंतर्भाव आहे, असेही त्यांनी सांगितले. “ज्या भाषेला इतिहास आहे, संस्कारांची जोड आहे, मातीचा गंध आहे, ती म्हणजे आपली मराठी!” या त्यांच्या वाक्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
लोककलांचा प्रवास या कार्यक्रमातून पुढे जात असताना ‘गोंधळी’ परंपरेचे दर्शन घडवले गेले. यामध्ये लोककलेतील पारंपरिक गोंधळ कसा आणि का घातला जातो, याचे कलाकृतीतून सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या गण सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘जोगवा’ या लोककलेच्या धाग्याने प्रेक्षकांना भारावून टाकले. या माध्यमातून कलाकारांनी त्या परंपरेतील व्यथा, वेदना आणि भावना प्रकट केली. ‘पोतराज’ या प्रकारात समर्पणाचे भावसंपन्न दर्शन उलगडून सांगितले.
शाहीरी परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ‘जय भवानी जय शिवाजी’ आणि ‘चमके शिवबाची तलवार’ या गजरात उजळून निघाला. त्यानंतर बासरीवादन, वारकरी भजन आणि ‘ज्ञानेश्वर माऊली, जय जय विठ्ठल’ च्या गजरात रंगमंचावर कलाकारांनी दिंडी सोहळा साकारला. दिव्यांग कलाकार ऋषी मोरे यांनी ‘भल्या माणसा…’ हे गीत सादर करत प्रेक्षकांना भावनिक साद घातली. रंगमंचावरच काही क्षणात वेशभूषा बदलत सादर करण्यात आलेल्या ‘आल्या पाच गवळणी’ या भारूडाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर सादर झालेल्या धनगरी नृत्याच्या तालावर प्रेक्षक थिरकले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘माझी मैना गावाकडे राहिली’ या गाण्याचे सादरीकरण करण्यासोबतच कलाकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे स्मरण करीत हुतात्मांना अभिवादन केले. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या समर्पित कलाजीवनाचा आलेख मांडणारी लावणी सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. भैरवीने कार्यक्रमाचा मनमोहक शेवट झाला. या कार्यक्रमातून मराठी लोककला, लोकसंस्कृती आणि लोकभावना यांचा रंगतदार मेळ घडला. रसिक प्रेक्षकांनी प्रत्येक सादरीकरणाला भरभरून दाद देत ‘फोक प्रबोधन’ला अविस्मरणीय बनवले.
पारंपरिक वाद्यांची जुगलबंदी ठरली शिखरबिंदू
बासरी, ढोलकी, डफ, पखवाज, दिमडी, चवंडक, ताशा, हलगी, संबळ, ढोल, टाळ, घुंगरू, हार्मोनियम, झांज, कोल्हापुरी हलगी, तुणतुणे, चंडा अशा पारंपरिक वाद्यांच्या सुमधूर तालाने संपूर्ण वातावरण संगीतमय झाले. महाराष्ट्राच्या मातीतील लय, ठेका आणि सूर यांचा संगम घडवत या वाद्यांची अप्रतिम जुगलबंदी साकारली गेली. वाद्यांच्या तालावर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले, तर कलाकारांनी आपल्या कौशल्याने रसिकांना अविस्मरणीय अनुभव दिला. पारंपरिकतेचा साज आणि आधुनिक सादरीकरणाची झळाळी यांचा सुंदर मेळ साधत या कार्यक्रमातील ही वाद्यजुगलबंदी खऱ्या अर्थाने शिखरबिंदू ठरली.
कलाकारांचे प्रेक्षकांकडून कौतुक
‘फोक प्रबोधन’ या कार्यक्रमाची मूळ संकल्पना आणि लेखन शेखर नवतरे यांचे असून, निर्मिती पूजा नवतरे यांनी केली आहे. या कार्यक्रमामध्ये ओम शिंदे, पियुष कांबळे, कृष्णा रिटे, प्रणव अवटे, ओंकार दाणे आणि अजिंक्य मोरे यांनी वाद्यवादन केले. साउंड रिदम ओंकार चव्हाण आणि पूजा नवतरे यांनी दिले. विविध गाण्यांचे गायन स्वप्नील कोकाळे, चैत्राली करे, अनिकेत खंडागळे, ओंकार ओटे, श्वेता रनवरे, ऋषिकेश मोरे, प्रज्ञा सावंत, रोहित साठे आणि सागर भोसले यांनी केले. भारूड सादरीकरण गायत्री निकम यांनी, तर बासरीवादन ओंकार सावंत यांनी केले. नृत्यकलाकार सनी शिंदे, प्रियंका वालकोळी, श्वेता रनवरे, प्राची भिलारे, राधा गायकवाड, काजल गोसावी, रोहित राठोड आणि विजय क्षीरसागर यांनी विविध पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले. बॅकस्टेजवर धनंजय थोरात, प्रतीक्षा क्षीरसागर, भाऊसाहेब पाटील, विरेंद्र केरीपाळे, अमेय मगदूम, मोहित शेख आणि अक्षय भोसले यांनी काम केले. उत्कृष्ट निवेदन, सादरीकरण, लयबद्धता आणि सृजनशीलतेसाठी सर्व कलाकारांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी दाद दिली.
……………..













